मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सध्या सारखीच आहे. हे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. राज्यात काही भागात निर्माण झालेली पूर परिस्थिती व इतर प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्यावतीने संपूर्ण मंत्रिमंडळ फिरत आहे. पंतप्रधान व गृहमंत्री दिल्लीत बसूनच काम करत आहे, ही काळाची व देशाची गरज आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात किंवा कुठे दौऱ्यावर गेल्यास अधिकारी व जनतेची गर्दी होते. ती गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. पंतप्रधान व राष्ट्रपती हा प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी हा प्रोटोकॉल का तोडावा? असा सवाल राऊत यांनी विरोधी पक्षांना विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. काम होत आहे हे महत्वाचे आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो त्यावर देखील सरकारचे काम सुरू आहे. कोरोनाच्या काळात डिजिटल मीडिया ही योजना मोदींचीच आहे. त्यानुसार सर्व राज्यांचे मुख्यमंत्री काम करत आहेत. विरोधकांना अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी एका जागी बसून काम केलेले रूचत नसेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा देश पालथा घालावा, असे सांगण्याचे धाडस विरोधी पक्षांनी दाखवावे. असे आवाहन राऊत यांनी विरोधकांना केले.