मुंबई - मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का ? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यातील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही. देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला.
संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांची ही बैठक गुप्त नव्हती आम्ही जाहीरपणे भेटलो. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहिती होती. 'सामना'साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही काल चर्चा केली. जेव्हा शरद पवार यांची मुलखात झाली सामनासाठी तेंव्हा मी जाहीर केले होते, की देवेंद्र फडणवीस यांची मुलखात घेईल परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले. फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, आम्ही काय बंकरमध्ये भेटलो नाही. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, भेटीगाठी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि विरोधकांच्या भेटीगाठीत चुकीचं काय? असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेनेला मजबुरीने एनडीए मधून बाहेर पडावं लागलं-
यावेळी राऊत यांनी नुकतेच एनडीएमधून अकाली दल बाहेर पडला त्यावर ही भाष्य केले. ते म्हणाले शिवसेना आणि अकाली दल हे NDA चे मजबूत स्तंभ होता. शिवसेनेला नाईलाजाने एनडीए मधून बाहेर पडावे लागले. मात्र एनडीएला आता नवे मित्र मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. पण ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही, त्याला मी एनडीए मानतच नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.