मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. राष्ट्रीयस्तरावर सुद्धा ते मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती दुर्दैवाने म्हणा किंवा अजून काही कारणाने बसली आहे. त्यांना आमंत्रण द्यायला द्यायला जाणे म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले वगैरे असे बोलणे चुकीचे आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे सिंहासन लवकर हलणार आहे, त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
शरद पवार हे फक्त औपचारिक निमंत्रण देण्यासाठी गेले होते. मराठा मंदिर ही राज्याची महत्त्वाची संस्था आहे. त्यांचा सोहळा आहे, त्या संदर्भामध्ये ते आमंत्रण देण्यासाठी गेले होते अशी माहिती आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ माजली, अशा बातम्या चालवणे चुकीचे आहे. यातून मीडियाने बाहेर पडून सत्य समजून घेतले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
खुर्ची त्यांना सुटत नाही हे सोडून द्या: जर असे असेल तर कोणी कोणाकडे जायला नको. विधिमंडळात अनेक पक्षांचे आमदार एकमेकांना भेटत असतात. त्यात गैर काही नाही. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर त्यात चुकीचे काय आहे? आम्ही सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन देत असतो. भले ते बेकायदेशीर पद्धतीने खुर्चीत बसले असतले तरी सध्या ते खुर्चीवर आहेत, त्या खुर्चीला मान द्यायला हवा, असेही राऊत म्हणाले.
जोपर्यंत मुख्यमंत्री खुर्चीवर बसले आहेत तोपर्यंत त्यांना मान देणे गरजेचे आहे. ती खुर्ची त्यांना सुटत नाही, हे सोडून द्या. पण त्या खुर्चीसमोर आमचे प्रश्न मांडणे विरोधी पक्षाचे काम आहे-संजय राऊत
मुंबईत १८ जूनला शिवसेनेचे महाशिवेशन: १८ तारखेला मुंबईत वरळीत शिवसेनेचे संपूर्ण दिवसभर महाअधिवेशन होणार आहे. ही काही बैठक नाही. सकाळी ११ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत महाअधिवेशन होणार आहे. संपूर्ण राज्यातून नाहीतर देशातून शिवसेनेची प्रमुख लोक या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे हा आमचा एकमेव अजेंडा असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकदा शिखरावर घेऊन जाणे आमचा मुख्य उद्देश असल्याचंही संजय राऊत म्हणाले.
आमची वज्रमूठ कायम राहणार: महाविकास आघाडीतील लोकसभा जागांसाठी जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. कोणालाही त्याची चिंता वाटण्याची गरज नाही. कोणालाही आनंदाच्या उकळ्या फुटण्याची गरज नाही. जागा वाटप संदर्भात सविस्तर चर्चा होईल. प्रत्येक जागा कोण जिंकू शकतो, कशा पद्धतीने जिंकू शकतो, याबाबत सहकार्य एकमेकांना केले जाईल. त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. विधानसभेचे जागावाटप सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे मतभेद होणार नाहीत. आमची वज्रमूठ कायम राहणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
मी पणाचा अहंकार: छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा उत्तम प्रकारे करणे हे प्रत्येक राज्यकर्त्याचे कर्तव्य आहे. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आम्ही त्यांना नतमस्तक होत राज्याभिषेक सोहळ्याला अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान स्थान होते. त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते. ते स्वराज्याचे संस्थापक होते. स्वराज्य स्थापन करताना त्यांनी १८ पगड जाती व सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आपलं सैन्य बनवले. आपले प्रशासन चालवून जनतेला न्याय दिला. त्यालाच शिवशाही म्हणतात. रावणाचा पराभव मी पणाच्या अहंकाराने झाला आहे. तसाच मोदींचा पराभव सुद्धा अहंकाराने होणार आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
हेही वाचा-