मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का ? ते पाहावे लागेल. 2024 च्या निवडणुकानंतर सरकार बदलत आहे. राष्ट्रपती शासन लागत आहे. काहीही होऊ शकते. मोदी साईबाबांचे दर्शन घेऊन भाषण करणार आहेत. ते स्वतः एक बाबा आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्यानं चर्चा होऊ लागल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. दिल्लीनं शिंदेंचे पायपुसणं केलं आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपा म्हणजे भाषण माफिया त्यापासून महाराष्ट्राला सुटका दिली पाहिजे. राज्यातील बेकायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. महाराष्ट्रमध्ये आपण हरत आहोत हे आता भाजपाला जाणवू लागले. जो जुगार ते हरत आहेत, एका नैराश्यातून ते महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे भाजपाला पंतप्रधानांना वारंवार बोलावावे लागत. देशाचे पंतप्रधान आहेत ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून कुठेही जाऊ शकतात, अशी खोचक टीका खासदार राऊत यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. मात्र, यावरती कुठलाही तोडगा सरकारनं काढला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार आहे. या अगोदर देखील मी म्हणलो होतो. जरांगे यांना पंतप्रधान मोदी यांच्यासमोर बसवले पाहिजे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या समोर बसून सांगितल्या पाहिजेत-खासदार संजय राऊत
45 दिवसांच्या अल्टिमेटमनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यरात्री दिल्लीला रवाना झाले. या अचानक दिल्ली दौऱ्यामागचं कारण अद्याप स्पष्ट असले तरी, मराठा आरक्षणासंदर्भात हा दौरा असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहेत. या सरकारला दिल्लीत पायपुसणं केलेलं आहे.
पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली, आग्राला गेले आणि सर्व दिल्लीश्वरानां धडा शिकून आले. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावं लागतं. मंत्रिमंडळाचा विस्तार राहिला बाजूला, विकास बाजूला राहिला आहे. हे भाजपचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत. आम्ही गुलाम आहोत हे त्यांनी स्पष्ट करावं. मग त्यांच्यावर आम्ही टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्ली चरणी आहे. भाजपकडे 105 चा आकडा असून सुद्धा काय वेळ आली आहे? हांजी हांजी करावी लागत आहे. बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागते, ही शोकांतिका आहे.
राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचणार आहे. तेथे ते साईबाबा समाधी मंदिरात पूजा व दर्शन घेतील. यासोबतच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केल्याने सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा-
- Uddhav Thackeray On BJP : भाजपाला मोठा धक्का, 'या' मोठ्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
- Sanjay Raut News: भाजपाच्या सहवासात आल्यापासून मुख्यमंत्री खोट्या शपथा घेऊ लागले-संजय राऊत
- Shiv Sena Dasara Melava : ...मग महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता..संजय राऊत यांची महायुतीवरून भाजपावर टीका