मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ज्यांनी तरुण नेत्यांची नावे घेतली, त्यासंदर्भात आता बोलणं योग्य नाही. सीबीआयचा अहवाल आल्यानंतर त्यावर बोलेन. मात्र, ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात दात उचकटले होते, त्यांचे दात घशात घातले जातील. कोणी राज्याची बदनामी करत असतील तर, उसळून उठले पाहिजे, षंढासारखे बसून चालणार नाही. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे महाराष्ट्रातील मुख्य नेते आहेत. त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी आहे. मुलाखत घेण्यासाठी मी त्यांना भेटलो होतो. आमची अनेक विषयांवर चर्चा झाली, एका क्षेत्रातील लोक भेटतात, तेव्हा चर्चा होतेच. फडणवीस यांना भेटणार असल्याचे संकेत आधी दिले. राज्यातल्या विरोधकांसोबत सर्वात जास्त संवाद असायला हवा, असे आपण मानत असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि काँगेस पक्षाने कृषी कायद्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. पण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष यांच्यात बैठका सुरू आहेत. त्याबाबतची सरकारची भूमिका लवकरच जाहीर करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
बिहार निवडणुकांबाबत ते म्हणाले, आम्ही त्याठिकाणी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी २०-२५ जागा सातत्याने लढतो आहोत. आम्हाला यंदाही लढण्याची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले. आमच्या लढण्याचा त्रास होत असेल तर, त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लावला. तसेच, गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा देऊन निवडणुकीत जाण्याचा निर्णय घेतला, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. परंतु, त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. महाराष्ट्र पोलीस विरुद्ध बिहार पोलीस यांच्यात संघर्ष करून आता ते निवडणूक लढत आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांना कोरोनाची लागण