मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप देशातील विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयला पत्र लिहिले आहे. या पत्रात खासदार राऊत यांनी पाचशे कोटींचे मनी लॉन्ड्रींग झाल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत या पत्राची माहिती दिली आहे. दुसरीकडे रत्नागिरीमध्ये प्रकल्प विरोध असताना सरकारकडून दुसरे जालियानवाला बाग होईल, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप- ट्विटमध्ये खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, पुण्याच्या दौड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्यातील भ्रष्टाचारा संदर्भात मी या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्यापही सरकारने या चौकशीसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे मी आता सीबीआय या भीमा पाटस साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात पत्र पाठवले आहे. हा गैरव्यवहार 500 कोटींचा आहे. आता पाहू पुढे काय होते, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
2016 पासून गैरव्यवहार-या पत्रात संजय राऊत यांनी भीमा पाटस साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत विविध आरोप केले आहेत. यात लेखापरीक्षण अहवालात 2016 पासून या कारखान्यात गैरव्यवहार होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या साखर कारखान्याने कोणतेही तारण न ठेवताच कर्ज घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सरकारने 25 कोटी रुपयांचे अनुदान देऊन देखील या साखर कारखान्याने सलग तीन वर्ष ऊस गळीत हंगाम बंद ठेवला होता. या साखर कारखान्यावर विविध बँकांची 180 कोटी होऊन अधिक थकीत कर्ज जमा करण्यासाठी एक रिकामी थकीत कर्ज योजनेचा लाभ घेण्यात या कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल कुल यांना अपयश आले आहे. असे आरोप खासदार संजय राऊत यांनी सीबीआयला पत्रात केले आहेत.
बुधवारी खासदार राऊत यांनी पुण्यात सभा- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सध्या अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यभरात सभा होत असतानाच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा देखील होत आहेत. या सभांसोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या स्वतंत्र सभा देखील ठिकठिकाणी होत आहेत. खासदार संजय राऊत यांची अशीच एक जाहीर सभा पुण्यातील वरवंड येथे होणार आहे. या सभेत देखील खासदार राऊत भीमा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत हल्लाबोल करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
हेही वाचा-Sanjay Raut News: सरकारचे 'डेथ वॉरंट' जारी; शिंदे सरकार १५-२० दिवसात कोसळेल- संजय राऊत यांचा दावा