मुंबई - 'जम्बो कोविड सेंटरमध्ये येण्याची वेळ कोणावर येऊ नये. पण सध्या वेळ कोणाला सांगून येत नाही. कोणावरती ही वेळ आलीच तर उपचाराशिवाय ते तडफडत रस्त्यावरती पडू नये, जे इतर राज्यात सुरू आहे. म्हणून हे सगळे प्रकल्प मुंबईत उभे राहत आहेत', असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. ते कांजूरमार्ग येथे उभे राहणाऱ्या 3000 बेडच्या कोविड सेंटरच्या कामाच्या शुभारंभावेळी बोलत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. दुसरी लाट थोपवण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आज (26 एप्रिल) कांजुरमार्ग येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या जागेत राज्य सरकार सिडको, पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने महा जम्बो कोविड सेंटरच्या कामाचा शुभारंभ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाला. 2500 बेड आणि 300 आयसीयू बेड या सेंटरमध्ये असणार आहेत. 15 जूनपर्यंत हे कोविड सेंटर उभे राहणार आहे.
'माझं म्हणणं आहे, की सरकार काय करत आहे? मुंबई महानगरपालिका काय करते? हे जर कोणाला पाहायचं असेल? तर त्यांनी कोविड सेंटर बनत आहेत, तिथे जाऊन पाहावं. पण आता दुसरी लाट सुरु आहे आणि ती अत्यंत गंभीर आहे. लोकांना तिसऱ्या लाटेचे भीती वाटते आहे. ही महापालिका किंवा सरकारतर्फे तिसऱ्या लाटेची तयारी आहे. हे सरकारचे पाऊल पडत आहे, हे विरोधकांनी, देशभरातल्या सगळ्यात जाणकारांनी, राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी मुंबईतून पाहायला पाहिजे, की नक्की आम्ही काय करत आहोत. 3000 बेडचे कोविड सेंटर हे सिडकोच्या मदतीने महापालिका सरकार आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या मदतीने उभे राहत आहे. त्यामध्ये 580 आयसीयू बेड आहेत. आज आयसीयू बेड मिळत नाहीत, त्याची तयारी इथे होते आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी जेव्हा मुख्यमंत्री सांगतात तेव्हा ही जबाबदारी सरकार एक कुटुंब कसं सांभाळते आहे, एक राज्य म्हणून हे कुटुंब सांभाळण्याची ही जबाबदारी आहे. आम्ही असं म्हणतो की कोरोनाच्या या सेंटरमध्ये कोणावर येण्याची वेळ येऊ नये. पण सध्या वेळ कोणाला सांगून येत नाही. त्याचीही तयारी आहे. कोणावरती ही वेळ आलीच तर उपचाराशिवाय तो तडफडत रस्त्यावरती पडून राहू नये, जे इतर राज्यात सुरू आहे. म्हणून हे सगळे प्रकल्प उभे राहत आहेत', असेही राऊत यांनी म्हटले.
मोदींवर हल्लाबोल -
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटे विरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पण दुसऱ्या लाटेची लढाई सुरू होण्यापूर्वी खबरदारी किंवा पूर्वतयारी केली असती तर? तज्ञानी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता तर? आता जी येईल ती त्सुनामी असेल. ही दुसऱ्या लाटेची मन की बात समजून घेतली असती तर आज त्सुनामीत देशाला गटांगळ्या घालण्याची वेळ आली नसती', अशी टीका संजय राऊत यांनी आजच्या (26 एप्रिल) सामनातील अग्रलेखातून केंद्रावर केली आहे.