मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे अकरा जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतले आहेत. या दुर्घटनेमुळे सध्या कार्यक्रमावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे अजित पवार यांनी रात्री भेट घेतली: या संदर्भात माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, तिथे जी काही लोक आली होती, ती सर्व आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारी होती. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी आलेल्या समाजाचा राजकारणाने अंत पाहिला आहे. हा अंत इतक्या टोकाला गेला की उष्माघाताने तिथल्या उपस्थित लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री नागपूरमधील सभा आटोपल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबईत आलो. यावेळी मध्यरात्री जाऊन माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार या महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांनी जाऊन या रुग्णांची भेट घेऊन, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
इथं फक्त राजकीय व्यवस्था पाहिली गेली: पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकसेवेबाबत आमच्या मनात आदर आहे. त्याबाबत आता काहीही बोलणार नाही. पण, जी काही दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत जे रुग्णालयात उपचार घेत आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. सध्या काही लोक सरकारवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.ती ठीक आहे. पण, इथे येणाऱ्या श्री सदस्यांची व्यवस्था न पाहता राजकीय व्यवस्था पाहिली गेली एवढे मात्र निश्चित स्पष्ट आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी योग्यच: काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सरकार विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. ही मागणी चुकीची म्हणता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे हा कार्यक्रम सरकारी होता. सरकारने या लोकांना बोलावले होते. सरकारकडे तज्ञ एक्सपर्ट असतात जे प्रत्येक गोष्टीचा अहवाल सादर करत असतात. मला वाटते या अनुभवी लोकांना समजायला हवे होते की, हा कार्यक्रम किती वाजता सुरू व्हायला हवा, किती वाजता संपला पाहिजे, किती वेळ सुरू राहिला पाहिजे. या सगळ्याचा अंदाज या लोकांना असायला हवा होता. मात्र, सरकारने या कार्यक्रमाचा फक्त राजकारणासाठी फायदा करून घेतला आणि त्यामुळेच हे बळी गेले असे मला वाटते. त्यामुळे ही चौकशीची मागणी देखील योग्य वाटते, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.