मुंबई - शिवसैनिक हा कधीही खोटे बोलत नाही. दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कसे काय शिवसैनिक होऊ शकते? शिवसैनिक म्हणतात, तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिवसेनेत प्रवेश करा म्हटले तर करतील का? असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. तसेच शिवसैनिक सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसत नाही, असा टोला लगावत त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिले.
आम्ही सरकार बनवणार नाही आणि संविधानाचा पेच निर्माण करणार, हे भाजपची खेळी जास्त काळ टिकणार नाही. थोडे मागे पुढे झाले तरी चालेले मात्र महाराष्ट्राला लवकरच चांगले सरकार मिळेल. निवडून आलेल्या सर्वच पक्षाच्या आमदारांना देखील शिवसेनेची सत्ता यावी असे वाटते. तसेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
हे वाचलं का? - देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात शिवसैनिकच मुख्यमंत्री - सुधीर मुनगंटीवार
उद्धव ठाकरे आणि शिवसेना भूमिकेवर ठाम आहे. आम्हाला अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद पाहिजे आहे. या भूमिकेवर शिवसेना आणि उद्धव ठाकरे ठाम आहेत. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटायला गेले होते. मात्र, त्यांच्याकडे बहुमत असते, तर ते खाली हात परतले नसते, असेही राऊत यावेळी म्हणाले.
आता भाजपची दडपशाही चालणार नाही. दहशतवाद, पोलिसी बळाचा वापर, तपास यंत्रणांचा वापर करून धमकावणे चालणार नसल्याचे देखील राऊत म्हणाले.