मुंबई - शिवसेनेचे संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा आज समाचार घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. मात्र, माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर राऊत यांनी उत्तर दिले आहे.
निवडणुकीची एवढी घाई का?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे?, त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचे काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्यांना चाप.. सरकारकडून कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित
एक दिवस ते मातोश्रीवरही येतील
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्यांचे स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचे मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतला होता. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.