मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल कालपासून दिल्लीत बसले असले तरी, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. अशी टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, दिल्लीवाले महाराष्ट्राची मजा पाहत आहेत.
खासदार राऊत यांचा सवाल : दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राच्या नेत्यांचा छंद जडलेला आहे. मला गंमत वाटते यांच्यावर आपत्रतेची कारवाई झाल्यावर हे सगळे लोक मिंधे गटाचे असतील? त्यांना आपल्या मातीतल्या नेत्यांकडे जाणे फार अडचणीचे वाटत होते. आम्हाला वेळ देत नाही, आमचे ऐकले जात नाही. मग आता तुम्ही दिल्लीत का फेऱ्या मारता? महाराष्ट्राची लीडरशिप दिल्लीमध्ये कधीपासून गेली? जेव्हा काँग्रेसचे राज्य होते तेव्हा दिल्लीचा हाय कमांड तिथे आदेश द्यायचे आणि टीका करायची मग आता काय बदल झाला? असा सवाल खासदार राऊत यांनी केला आहे.
फुटलेल्या गटाला खाते मिळाले नाही : शपथ घेऊन दहा दिवस होत आले तरी राष्ट्रवादीतील फुटलेल्या गटाला खाते मिळाले नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी शपथ घेऊन एक वर्ष झाले तरी, त्यांच्या इतर लोकांनी जे कोट शिवले त्यांची साईज बदलली तरी, विस्तारांची परवानगी मिळत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान हिंदुत्वाने वगैरे-वगैरे असेच कचऱ्याच्या पेटीत टाकून ठेवले आहे.
मिंधे गटातील लोकांच्या पोटात गोळा : ज्या खात्यांचा आग्रह अजित पवार आणि त्यांचा गट धरून बसलाय त्या खात्यांसंदर्भात त्यांना दिल्लीची कमिटमेंट आहे. आता ही कमिटमेंट पूर्ण होते की नाही ते पाहू. खात्याची मागणी झालेली आहे. मग गृहनिर्माण खात असेल, अर्थ खाते असेल, समाज कल्याण खाते असेल या खात्याची कमिटमेंट आहे. अजित पवार यांना अर्थ खाते सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. अजित पवारांची व्यक्तिगत टिपा टिपणी करण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रचे अर्थ खाते सांभाळण्याचे आणि आपापल्या लोकांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे कदाचित मिंधे गटातील लोकांना पोटात गोळा उठला असेल. कारण याच लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर शिवसेना सोडली. आता त्याच लोकांना कागद घेऊन अजित पवारांकडे जावे लागेल.
असंतोषाला आमंत्रण : राऊत म्हणाले की, मंत्रीपदाचा विस्तार होईल की नाही ही शंका आहे. मंत्रिपदाचा विस्तार या घडीला करणे म्हणजे दोन्ही गटातील असंतोषाचा भडका उडण्याचे कारण होईल. अजित पवार यांच्या गटातील जे मंत्री झालेले आहेत हे सगळेच वजनदार नेते आहेत. त्यातील अनेकांनी गृहमंत्री पद सांभाळलेले आहे. उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच तोलामोलाची खाती द्यावी लागतील. त्याच्यामुळे नवीन विस्तार करणे म्हणजे असंतोषाला आमंत्रण देणे आहे.
म्हणून काही नेते भाजपच्या गोटात शिरले : महाविकास आघाडीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आघाडीत फूट पडेल असे मला असे वाटत नाही. एकत्र बसून निर्णय घेऊ. महाविकास आघाडीमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो आणि निर्णय घेतो. काही लोकांना गुलामी आवडते. गुलामाला गुलाम असण्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. पण, काही लोक स्वतःच गुलामी पत्करतात आपल्या गळ्यात गुलामीचा पट्टा घालून घेतात, त्याला नाईलाज आहे. राष्ट्रवादीचे अनेक आमदार किंवा नेते त्यांचे साखर कारखाने, बँका, गिरण्या, दूध उत्पादक संघ आहेत. तसेच त्यांचे इतर काही घोटाळे घडामोडी याच्यातून बचाव करण्यासाठी हे लोक आज अजित पवारांबरोबर भाजपच्या गोटात शिरले हे स्पष्ट आहे. अनेकांचे कारखाने अडचणीत आहेत. अनेकांच्या बँका डुबलेल्या आहेत. बँकांच्या चौकशा लागल्यात. त्या त्यांना थांबवायचे आहेत. आता हसन मुश्रीफ यांचे काय होणार? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
हेही वाचा -
- Sanjay Raut Arrest : औरंगाबादमध्ये खासदार राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे आंदोलन
- Sanjay Raut on Devendra Fadnavis: गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून डीलिंग सुरू, संजय राऊतांच्या नव्या आरोपाने खळबळ
- Sanjay Raut criticized Devendra Fadnavis: कलंकित सरकारमध्ये फडणवीस अंगाला हळद लावून बसलेत - खासदार संजय राऊत