मुंबई : संजय राऊत आणि माझ्यात कधीच वाद नव्हता, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे 9 जून 2023 रोजी पक्षाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रम होणार होता. मात्र हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे चक्री वादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य जनता आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
'..तर राजकारण सोडणार' : शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्यावर ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुमाने यांनी दाखवून द्यावे की मी एखाद्याकडून पैसे घेऊन काम केले. त्यांनी तसे केल्यास मी राजकारण सोडून देईन. मात्र माझ्यावरील आरोप जर सिद्ध झाले नाही तर त्यांना घरी बसावे लागेल, असे आव्हान अजित पवार यांनी तुमाने यांना दिले आहे.
सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बदल्यांच्या संदर्भात एक रेट कार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करायचे अधिकार ठराविक आमदारांना देण्यात आले आहेत. यावर लाखो कोटी रुपये खर्च करून बदल्या करून घेणारा अधिकारी सरकारचे काम प्रामाणिकरित्या करणार का?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. असा प्रकार राज्याच्या कधीही इतिहासात घडला नव्हता. त्यासोबत पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप नको, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :