मुंबई: शिवसेनेत सर्व प्रकारची पदे भोगून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले प्रमुख आमदार व नेत्यांना लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. बंजारा समाजाच्या मतांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या संजय राठोड यांनी गटात गेले आहेत. मात्र, बंजारा समाज, महंतांची फौज ठाकरेंकडे आजही कायम आहे. माजी आमदार गिरधर राठोड यांचा मुलगा अनिल राठोड यांनी देखील शिवबंधन बांधल्याने संजय राठोड यांची पुर्णतः नाकेबंदी होण्याची शक्यता आहे.
बंजारा समाजाचा मोठा पाठिंबा: शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर संजय राठोड शिंदे गटात गेले. राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत. मतदारसंघातील बंजारा मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. शिंदे गटात गेल्यानंतर संजय राठोड यांनी बंजारा समाजाचा मोठा पाठिंबा आहे, दावा केला होता. तसेच ठाकरे गटात कोणीही जाणार नाहीत, असेही राठोड म्हणाले. मात्र, राठोड शिंदे गटात जाताच बंजारा समाजाचे अनेक नेते, महंत मातोश्री गाठून ठाकरेंना पाठिंबा जाहीर करत आहेत. संजय राठोड यांच्या मदतीला सतत उभे राहणारे सुनील महाराज यांच्यासह 3 महंतांनी यापूर्वी ठाकरेंना पाठिंबा दिला होता.
संजय राठोड विरोधात महंतांची, नेत्यांची फौज: पोहरादेवी हे बंजारा समाजाचे शक्तीपीठ आहे. या शक्तिपीठाच्या महंतांचा आदेश बंजारा समाजासाठी शिरसावंध्य असते. पूजा चव्हाण प्रकरणात महंतांनी संजय राठोड यांच्या मागे भक्कम उभे राहिले. मंत्रिमंडळात निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मध्यस्थी केली होती.
महंत ठाकरेंना पाठिंबा: मात्र, शिवसेनेत गटबाजी झाल्यानंतर शिंदेंना संजय राठोड यांनी पाठिंबा दिला. बंजारा समाज यामुळे संतप्त झाला असून संजय राठोड यांचा टप्प्यात कार्यक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाचे महंत ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. एकेकाळचे शिवसैनिक, बंजारा धर्माचे संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज आणि माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात महंतांची आणि नेत्यांची फौज उभी राहिल्याने त्यांना मोठा धक्का मानला जातो आहे.
पक्षप्रमुखांची साथ सोडणार नाही: संजय राठोड शिवसेनेच्या आणि बंजारा समाजाच्या जीवावर आमदार झाले, मंत्री झाले. वैयक्तीक क्षमतेवर नाही. मंत्री झाल्यानंतर समाजासाठी त्यांनी काही केले नाही. समाज ही त्यांना आता नेतृत्व मानत नाही. गद्दारांमुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. १९९५ पासून शिवसैनिक असल्याचे अनिल राठोड यांनी सांगितले. तसेच मधल्या काळात आता गेलेल्या गद्दारांमुळेच भाजपमध्ये गेलो. तिथेही मागासवर्गीय आणि संघटक असल्याने सुरुवातीपासून डावलायला सुरुवात केल्याचे राठोड यांनी सांगितले. मात्र आता काहीही झालं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे अनिल राठोड म्हणाले.