मुंबई - पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑप. बँकेवर रिजर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बँकेच्या संचालक मंडळांमधील ९ जणांचा भाजपशी संबंध आहे. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की, ही बँकच भाजप चालवत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या हेच त्या संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार देत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संजय निरूपम यांनी केली आहे.
आज काही खातेधारकांना सोबत घेऊन मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी भांडुप येथील पीएमसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात रिजर्व्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकाची भेट घेतली. यावेळी खातेदारांना 1 हजार रुपये मिळणे हा अन्याय असून किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल, तर मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपाती राहून संचालकांच्या संपत्तीवर टाच आणावी. त्यांची संपत्ती जप्त करून खातेदारांना त्यांची रक्कम परत करावी, असे म्हटले.
हेही वाचा - पीएमसी बँक प्रकरणी किरीट सोमय्या यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार
पीएमसी बँकेकडून खातेदारांना केवळ 1 हजार रुपये मिळणे हा अन्याय आहे, तर काही विशेष वेळेमध्ये बँकेने खातेदाराचे पैसे देणे गरजेचे आहे. तसेच हाऊसिंग सोसायटीची खाती लवकरात लवकर चालवण्यात यावी. या बँकेच्या संचालकाने दिवाळखोरीत निघालेल्या एचडीआयएलचा ३ हजार कोटींचे कर्ज दिले, त्यामुळे या प्रकरणात बँकेच्या संचालकाचेही लागेबांध असल्याचा किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. त्यांना पोलिसांनी सहकार्य करावे. बँक काँग्रेसच्या काळात बनली. मात्र, भाजप सरकारच्या काळात लुटली गेली. त्यामुळे सर्व संचालक मंडळाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर उद्या आरबीआयच्या वांद्रे कार्यालयात जाऊन हा प्रश्न मांडणार असल्याचे संजय निरुपम म्हणाले.
हेही वाचा - 'पीएमसी बँक बुडाली त्याला युतीचे सरकारच जबाबदार; त्यांच्यावर कारवाई कधी?'