मुंबई - सातशे किलोमीटरचा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ( Balasaheb Thackeray Samruddhi Highway ) 2024 मध्ये पूर्ण करणार असून हा संपूर्ण रस्ता पर्यावरण पूरक तयार करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी दिली आहे. विधान भवन परिसरामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी समृद्ध महामार्गाबाबत माहिती दिली.
प्राण्यांना रस्ता ओलांडू लागू नये, यासाठी भूमिगत बायपास -
या रस्त्यालगत जवळपास साडे अकरा लाख झाडांची लागवड केली जाईल. तसेच अडीशे मेगावॉट सोलर एनर्जी जनरेट करणारा प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने गेम चेंजर प्रकल्प असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. समृद्धी महामार्ग जंगलातून जात असताना प्राण्यांना अडसर होणार नाही. याची खास काळजी घेण्यात आली आहे. प्राण्यांना रस्ता ओलांडू लागू नये, यासाठी भूमिगत बायपास बनवले जाणार आहेत. त्यामुळे प्राण्यांनाही हाणी होणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तीन राज्यांना समृद्धी महामार्ग जोडणार -
मुंबई ते नागपूर एवढाच समृद्धी महामार्ग न ठेवता पुढे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा पर्यंत हा मार्ग पोहोचवला जाणार आहे. तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांना या महामार्गाने जोडण्यात येईल. या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा मे 2024 पर्यंत खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.