मुंबई - 'सार काही समष्टीसाठी' या समष्टी फौंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 'नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार' डॉ. नारायण भोसले यांना, 'समष्टी उलगुलान पुरस्कार' डॉ. अजित नवले यांना तर 'समष्टी गोलपीठा युवा पुरस्कार' शरद तांदळे यांना जाहीर झाला आहे. मानवी उत्थानाच्या व परिवर्तनाच्या चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. येत्या 14 व 15 मार्चला मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
हेही वाचा - 'शिमगा संपला, त्यामुळे सरकार पाडण्याचा मुहूर्त विरोधकांकडे नाही'
प्रथम दोन पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 25 हजार व मानपत्र असे आहे. तर गोलपीठा युवा पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये व मानपत्र अशी आहे. या पुरस्काराचे वितरण 'सारं काही समष्टीसाठी' या कार्यक्रमात होणार आहे. हे पुरस्कार 14 आणि 15 मार्चला विद्यानगरी, मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठातील कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान एकूण 4 नाटके, 14 लघुपट, 3 चर्चासत्रे, कविता वाचन असा परिपूर्ण कार्यक्रम होणार आहे.
परंपरागत भीक मागण्याचा मार्ग नाकारून शिक्षणाच्या पायवाटेने कसरत करत नाथपंथी डवरी समाजातून पहिला पीएच. डी धारक होण्याचा मान मिळवणारे, ख्यातनाम विचारवंत बुद्धीवादी डॉ. नारायण भोसले यांचे काम निश्चितच मोठे आहे. तसेच भूमिहीन शेतकरी, आदिवासी कामगार वर्गाला संघटीत करून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 21 व्या शतकातील सर्वात लक्षणीय असा लाँग मार्च काढून या सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे डॉ. अजित नवले यांचे कार्य स्पृहणीय आहे. त्याचबरोबर लेखन आणि उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, रावण या लोकप्रिय संशोधन कादंबरीचे लेखक शरद तांदळे हे प्रसिद्ध उद्योजकही आहेत.
हेही वाचा -हा अर्थसंकल्प संयुक्त महाराष्ट्राचा आहे का? विधानसभेत फडणवीसांचा सरकारला सवाल