मुंबई - भारतीय रेल्वेकडून प्रवास या व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात येतात. यातील एक योजना म्हणजे आता पश्चिम रेल्वे मार्गावर पाच रेल्वे स्थानकांवर वातानुकूलित सलूनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक आणि अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन सलून उभारण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी उपक्रम -
पश्चिम रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांना केस कापणे, मसाज करणे, फेशियल करण्याची सुविधा रेल्वे स्थानक परिसरात मिळावी, याकरिता पश्चिम रेल्वेकडून स्वरसय्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावरील सलूनचा वेळ सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रवासी या वेळेत सलून सेवेचा लाभ घेऊ शकतात. प्रवाशांचा जास्त कालावधी लोकल प्रवासात इच्छित लोकांची वाट बघण्यात जातो. त्यामुळे प्रवाशांचे त्यांच्या दैनंदिन सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती 'ईटीव्ही भारत'ला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - Corona Bulletin : राज्यातील कोरोना परिस्थितीचा वेगवान आढावा
5 वर्षांचा करार -
पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक आणि अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन सलून उभारण्यात येणार आहे. तर, गुजरातमध्ये सुरत येथे एक सलून उभारण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकावर प्रत्येकी 256 चौरस फूट इतकी जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, रेल्वेकडून पाच वर्ष करार करण्यात येणार आहे.
सलूनमध्ये या मिळणार सुविधा -
केस कापणे, डोक्याची मालिश, चेहऱ्याची मालिश, केसाला ड्रायसारख्या सर्व सुविधा या वातानुकूलित सलूनमध्ये असणार आहे. यामध्ये प्रत्येक बाबीचे शुल्क माफक दरात असणार आहे. सलून चालकाने किंवा कंत्राटदाराने नियमाचे उल्लंघन केल्यास किंवा प्रवाशांना इच्छित सेवांना दिल्यास कंत्राटदाराला दहा हजार रुपये दंडाची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच रेल्वे स्थानकातील प्रत्येक सेलमध्ये तक्रार वही असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.