मुंबई : सलमान खानची बहीण अर्पिता खानचे हिऱ्याचे झुमके तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमधून चोरीला गेले आहेत. अर्पिताने मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तिच्या घरी काम करणाऱ्या नोकराला अटक केली आहे. संदिप हेगडे असे त्याचे नाव असून तो मुंबईतील विलेपार्ले पूर्व भागातील आंबेवाडी झोपडपट्टीचा रहिवासी आहे.
नोकराकडून झुमके जप्त : हेगडे हा इतर 10 लोकांसह अर्पिता खानच्या स्टाफ टीमचा सदस्य होता. तो चार महिन्यांपासून तिच्या घरी कामाला होता. त्याच्यावर कलम 381 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीचे कानातले जप्त केले आहेत. अर्पिताने तिच्या तक्रारीत तिच्या हिऱ्याच्या झुमक्यांची किंमत 5 लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. झुमके बेपत्ता झाले तेव्हा ते मेकअप ट्रेमध्ये ठेवले होते असा दावा तिने केला आहे. खार पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक मोहन माने यांच्या नेतृत्वाखाली पीआय विनोद गावकर, पीएसआय लक्ष्मण काकडे, पीएसआय गवळी आणि तपास कर्मचार्यांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आले होते.
सलमान खानलाही मिळाली होती जीवे मारण्याची धमकी : सलमान खानची बहीण अर्पिताचे लग्न अभिनेता आयुष शर्मासोबत झाले आहे. 2014 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना अहिल नावाचा मुलगा आणि आयत नावाची मुलगी आहे. अर्पिता आणि आयुष यांनी अलीकडेच मुंबईत एका भव्य ईद पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सलमान खान, कतरिना कैफ, विकी कौशल, अनिल कपूर आणि तब्बूसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून खान कुटुंब कठीण परिस्थितीतून जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे तो चर्चेत होता. यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
हेही वाचा :