मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानने कमल आर खानविरोधात मुंबई शहर दिवाणी कोर्टाने मानहानी प्रकरणात कारवाई करण्यासाठी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. सलमान खान विरुध्द कमल आर खानने अवमानकारक टीका केल्याने हा खटला सलमानचया वकिलांनी दाखल केला होता. सलमान खानवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे व्हिडिओ किंवा इतर सामग्री बनविण्यापासून किंवा अपलोड करण्यापासून कमाल आर खानला मज्जाव करण्यासाठी खटल्यात अवमान कारवाईसाठी अर्ज दाखल केला आहे.
11 जूनला पुढील सुनावणी
या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली तेव्हा के.आर.के यांचे वकील मनोज गडकरी यांच्यामार्फत सांगितले होते, की पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कोणतीही मानहानीकारक टिप्पणी केली जाणार नाही. तथापी, असे असूनही कमल आर खानने अवमानकारक ट्वीट प्रसिद्ध केले, असा दावा सलमान खान ह्यांच्या वकिलांनी कोर्टात केला. अतिरिक्त न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करण्यात आला. ह्या प्रकरणात पुढील सुनावणी शुक्रवारी 11 जूनला करण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी के.आर.के यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर 'भ्रष्टाचार बॉलीवूड' या नावाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने सलमान खानसह बॉलिवूड सेलिब्रिटींवर निंदनीय, अत्यंत बदनामीकारक आरोप केले आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खानची प्रतिमा भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आले होते, असे या तक्रारदारांनी म्हटले आहे. नोव्हेंबर 2020 रोजी पोस्ट केलेल्या एका दुसर्या व्हिडिओमध्ये केआरकेने सलमान खानच्या ब्रँड 'बीइंग ह्यूमन'विरूद्ध ठामपणे दावा केला होता की ही धर्मादाय संस्था फसवणूक आणि मनी लॉड्रिंगमध्ये गुंतलेली आहे. सलमान खानने असा दावा केला आहे, की अशा प्रकारचे खोटे आरोप त्याच्या कित्येक वर्षांच्या मेहनत आणि प्रयत्नातून तयार केलेल्या त्याच्या ब्रँडची सद्भावना, प्रतिष्ठा आणि प्रतिमा डागाळत आहेत. आता ह्या प्रकरणी न्यायालय 11 जून 2021 रोजी सुनावणी करणार आहे.