मुंबई - बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेला सलमान खान आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी सलमानच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी मात्र सलमानने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर जमू नका, असे आवाहन सलमानकडून करण्यात आले आहे. असे असले तरी रात्री काही चाहते सलमानला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर पोहचल्याचे पाहायला मिळाले.
यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही
दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर धूमधडाक्यात साजरा करतो. पण यंदा सलमान त्याचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सलमानने एक पत्रक प्रसिद्ध करुन चाहत्यांना आवाहन केले आहे. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला प्रचंड प्रेम देतात, मात्र यावर्षी कोरोनामुळे माझ्या घराच्या बाहेर गर्दी करु नका, सोशल डिस्टंन्सिंग पाळा आणि सुरक्षित राहा, मी यावेळी गॅलेक्सीत नाही, असेही सलमानने आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.
कोरोनाकाळात मदत
लॉकडाऊन काळात सलमानने लोकांचे प्रबोधन करण्याचा मार्ग अवलंबला होता. यात लोकांनी घरी रहावे, फिजीकल डिस्टन्सिंग पाळावे यासाठी त्याने विविध माध्यमांचा वापर केला. लॉकडाऊननंतर सर्व प्रकारच्या शूटिंगना स्थगिती मिळाली. अशावेळी सलमानने ऑल इंडिया स्पेशल आर्टिस्ट्स एसोसिएशन (एआईएसएए) शी संबंधित रोजंदारीवरील कामगारांना आर्थिक मदत करण्यापासून ते ३२ हजार श्रमिकांना त्याने मदतीचा हात दिला. सलमान निरंतरपणे कुठे मदत करु शकू यावर लक्ष ठेवून आहे.
नवा चित्रपट
54 वर्षीय अभिनेता सलमान खान आगामी 'राधे - युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाचे शुट ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले होते. यापूर्वी दिशा पाटनी आणि रणदीप हूडा यांची भूमिका असलेला 'राधे' हा चित्रपट यापूर्वी २२ मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता पण कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे त्याला उशीर झाला आहे.
सलमान खान हा ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन लार्जर दॅन लाईफ जगण्यासाठी ओळखला जातो. त्याचे प्रचंड फॅन्स असले तरी टीकाकर आणि शत्रूंचीही संख्या कमी नाही. सलमान आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचलाय की त्याला आता आपल्या चित्रपटांचा रिव्ह्यूही वाचण्यात रस नसतो.
हेही वाचा - इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला 35 वर्षीय तरुण कोरोनाबाधित