मुंबई: या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते समाविष्ट झाले आहेत. लव जिहाद संदर्भात कायदा लवकरात लवकर अस्तित्वात करावा, त्याचबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येबाबत योग्य ते नियंत्रण करण्यात यावे. यासंदर्भामध्ये सुद्धा कायदा अस्तित्वात करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. हिंदू जनजागृती मोर्चात भाजप नेते किरीट सोमैय्या, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरण पावसकर, केशव उपाध्ये सहभागी झाले आहेत. हिंदू संघटनांचे कार्यकर्ते देखील हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू धर्म रक्षण विराट मोर्चाचे आयोजन: लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला शिवाजी पार्क येथे सुरुवात झाली आहे. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेले आहे, अशा सर्वांनी मोर्चात सहभाग घेतल्याचे सांगितले जात आहे. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती सर्वधिक दिसून येत आहे. हिंदू धर्म, हिंदू समाज हिंदुस्थानाच्या कल्याणासाठी आणि 'लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा' राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्म रक्षण विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वी या ठिकाणी मोर्चे: कोल्हापूरमध्ये लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या आदींच्या विरोधात 1 जानेवारीला हिंदू जनसंघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. कोल्हापूरातील बिंदू चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली होती. शस्त्र पूजनाने या मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अवघा बिंदू चौकातील वातावरण भगवेमय झाले होते.
पुण्यात मोर्चा: पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 18 डिसेंबरला सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधात सरकारने कायदा अमलात आणावा, या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. हजारोच्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चात सहभागी होत त्यांनी आपल्या मागण्या मांडलेल्या होत्या. अत्यंत शांततेत पार पडलेल्या मोर्चात स्थानिक राजकीय नेत्यांनी ही सहभाग नोंदवला होता. जय श्रीराम, जय श्रीराम या घोषणांनी मोर्चाची सुरुवात झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी हिंदू बांधव रस्त्यावर उतरले होते. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधात कायदा सरकारने अमलात आणावा ही मागणी घेऊन आज विराट मोर्चा काढण्यात आला होता. चिंचवड महावीर चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथंपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.