मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबई शहरातील रूग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सेंट जॉर्ज रुग्णालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. पर्यटन, पर्यावरण व राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मानपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश देवून सेंट जॉर्ज रुग्णालयाचा गौरव करण्यात आला.
2019-2020 साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबई शहरातील रूग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात रूग्णालय आणि रूग्णालय परिसरातील स्वच्छता, बाह्य रूग्ण विभाग, रूग्णांचे कक्ष, ऑपरेशन थिएटर, रूग्णालयातील स्वयंपाकगृह यांची स्वच्छता, रूग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुका कचरा, ओला कचरा, वैद्यकीय कचरा यांची विल्हेवाट, रुग्णालय, रूग्णालय परिसर आणि रूग्णांशी संबंधित साधन सामग्रीचे निर्जंतुकीकरण या निकषांचा स्वच्छता सर्वेक्षणामध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. या सर्वच निकषांमध्ये सेंट जॉर्ज रुग्णालय संपूर्ण मुंबई शहरात अव्वल ठरले.
हेही वाचा - वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच
प्रथम क्रमांकाचे मानपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. समुहाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे आणि सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. रूग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी रूग्णालयातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सफाई कामगार, नर्सेस, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सहकारी वर्गाचे कौतुक करून अभिनंदन केले. या पुढील कालावधीत देखील सेंट जॉर्ज रूग्णालय हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसरच राहिल, असा विश्वास देखील डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केला.