मुंबई - चर्निरोड येथील सुप्रसिद्ध सैफी हॉस्पिटलमधील एका 85 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे डॉक्टर रुग्णालयात सेवा देत असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे, त्यांच्या मृत्यूनंतर इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रुग्णालय येत्या 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी सध्या काही रुग्ण उपचार घेत असल्याने या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालय बंद केले जाणार आहे. तशी नोटीसही हॉस्पिटलच्या गेटवर लावण्यात आली आहे.
८५ वर्षीय डॉक्टरचा हिंदुजा रुग्णालयात मृत्यू झाला. या डॉक्टरला मधुमेहाचा त्रास होता तसेच त्यांना पेसमेकर बसविला होता. शिवाय ते त्यांच्या नातवाच्या संपर्कात होते. त्यांचा नातू यु.के. वरून आला होता. नातवाच्या माध्यमातून डॉक्टरांना कोरोना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉक्टर आणि त्यांच्या नातवाची खासगी लॅबमध्ये चाचणी करण्यात आली होती. पुन्हा पुण्याच्या एनआयव्हीमध्ये चाचणी केल्यानंतर डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
सैफी रुग्णालयातील डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या हॉस्पिटलमध्ये सुमारे एक हजार कर्मचारी काम करत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी हे रुग्णालय 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.