मुंबई - शिर्डी येथील ग्रामस्थांनी बंद पुकारल्याच्या पार्श्वमीवर आज (सोमवारी) सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. शिर्डीच्या ग्रामस्थांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याचे या बैठकीत जाहीर केले. पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. जन्मस्थळाचा वाद कशासाठी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळण्यात आला होता. यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती, अशीच भूमिका आता असावी. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा, असा मुद्दा आमदार विखे-पाटील यांनी यावेळी मांडला.
हेही वाचा - पाथरीकरांना मुंबईचे निमंत्रणच नाही; मंगळवारच्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय होणार
मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री यांचा शिर्डी संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.