मुंबई- कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरच कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत इंटर्न, निवासी डॉक्टर, एसएमओ आणि इतर डॉक्टर कोरोनाबाधित होत होते. मात्र, सायन रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. सायन रुग्णालयाच्या डेप्युटी डीन यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर डीनदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची उद्या-परवा कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डेप्युटी डीनला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नायर, कस्तुरबा, सायन, कूपर आदी रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. डॉक्टर-नर्स थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने आवश्यक ती काळजी घेतल्यानंतरही काही डॉक्टर कोरोनाबाधित होत आहेत. यात इंटर्न आणि निवासी डॉक्टरांचा भरणा मोठा आहे. तर त्यातही डॉक्टरांसाठी सायन रुग्णालय हॉटस्पॉट ठरला आहे. याच रुग्णालयात सर्वाधिक निवासी डॉक्टर आणि इतर डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 120 हून अधिक निवासी डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. तर एसएमओ आणि इतर डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे. अशात आता, चार दिवसांपूर्वी थेट डेप्युटी डीनलाच कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून डीन कार्यालयातील 10 जणांना क्वारंटाइन करत त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाचे डीनही तात्काळ क्वारंटाइन झाले आहेत. आपली तब्येत ठीक असून अद्याप आपल्याला कोणतीही लक्षणे नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे. तर उद्या-परवा आपली कोरोना चाचणी होईल असे ही ते म्हणाले.
मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट अर्थात धारावी, माहीमपासून सायन रुग्णालय जवळ आहे. त्यामुळे येथील मोठ्या संख्येने रूग्ण सायन रुग्णालयात दाखल होत आहेत. रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण पडत असून रुग्णांच्या थेट संपर्कात आल्याने डॉक्टरच कोरोनाचे शिकार होत आहेत.