मुंबई- वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँचमधून बदली केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली. वाझे यांना निलंबित करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. वाझे यांना निलंबित करावे यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. वाझे हेच हिरेन यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. सरकार वाझे यांना पाठीशी घालत असल्याचेही दरेकर म्हणाले. मात्र विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले.
काय म्हणाले दरेकर
सचिन वाझे यांना निलंबित करावे या मागणीसाठी विरोधक भलतेच आक्रमक झाले होते. हिरेन यांच्या पत्नीने जो जबाब नोंदवला आहे त्यानुसार सचिन वाझेंना तात्काळ निलंबीत केले पाहीजे अशी मागणी दरेकरांनी केली. त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी खुले सोडलं आहे का? असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला. वाझे हा सरकारचा जावई आहे का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. जो पर्यंत वाझेला निलंबित केले जात नाही तो पर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराच दरेकरांनी दिला.
कोणाचाही जावई असला तरी कारवाई झालीच पाहिजे
वाझे प्रकरणावरून विधानपरिषदेत गोंधळ सुरू होता. त्यावेळी परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत कोणाचाही जावई असला तरी दोषी असेल तर त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शिवाय दरेकरांना त्वेशांनी चुकीचे मुद्दे सभागृहात मांडू नयेत यासाठी त्यांना समजही दिली.
सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली
मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूचे पडसाद विधानपरिषदेत उमटले होते. वाजेंची तात्काळ निलंबनाची मागणी लावून धरत सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. दरम्यान, सचिन वाझे यांची क्राईम बॅच मधून बदली केली असून या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री आणि देशमुख यांनी विधान परिषदेत दिली.
काय आहे प्रकरण
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आढळून आली होती. याप्रकरणाचा तपास एटीएस करत होते. मात्र केंद्राच्या एनआयएनेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसमार्फत चौकशी केली जात आहे. तसेच सचिन वाझे यांना क्राईम ब्रँच पदावरून बाजूला केले आहे. त्यामुळे वाझे विरोधात विरोधकांकडे पुरावे असल्यास, एटीएसला द्या. एटीएसमार्फत पूर्णतः निःपक्षपातीपणे आणि नियमानुसार चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकरणात कोणाच्याही जावयाला सोडणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा आता एनआयएही तपास करत आहे. जी स्कॉर्पीओ कार अंबानींच्या घराबाहेर सापडली होती ती हिरेन यांच्या मालकीची होती.
विरोधकांचा गोंधळ
सचिन वाझेला तात्काळ निलंबन करा अशी मागणी लावून धरत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. दादागिरी नही चलेगी अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या. यावेळी सत्ताधारीही घोषणाबाजी करत होते. त्यामुळे सुरुवातीला ५ मिनिट आणि नंतर १० मिनिटसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.
हेही वाचा - 'आपला निर्णय म्हणजे एक घाव दोन तुकडे, इथे तीन पक्षांचे सरकार' अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण
हेही वाचा - अँटिलियाबाहेर स्फोटके प्रकरणी एनआयएचा तपास सुरू!