मुंबई - एनआयएच्या ताब्यात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या वकिलांकडून त्याच्या प्रकृतीविषयी न्यायालयमध्ये माहिती देण्यात आली आहे. सचिन वाझेला मधुमेहाचा त्रास असून त्याच्या हृदयाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी 90 टक्के ब्लॉक असल्याचे वकील रोनक नाईक यांनी न्यायालयाला सांगितले. वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार वाझेवर उपचार करणे गरजेचे असल्याचेही रोनक नाईक यांनी म्हटले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात क्राईम ब्राँच अधिकारी सचिन वाझेला अटक केलेली आहे. 13 मार्चला अटक केल्यापासून त्याला दुसऱ्यांदा एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. 3 एप्रिलला सचिन वाझेची कोठडी संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने यासंदर्भात सचिन वाझेचा वैद्यकीय अहवाल मागवला असून आज (शनिवारी) न्यायालयामध्ये तो सादर केला जाणार आहे. या बरोबरच सचिन वाझेच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी एनआयए करणार असल्याची माहिती मिळत आहे.
एका महिलेची एनआयएने केली चौकशी -
सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण याचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच अनेक दस्तावेज तपासण्यात आले आहेत. या प्रकरणात सचिन वाझे यांनी हॉटेल ट्रायडेंटमध्ये एक रुम बुक केल्याचे देखील समोर आले होते. तसेच या ट्रायडेंट हॉटेलमधील एक सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले होते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझेच्या हातात काही बॅग दिसत होत्या. तसेच त्याच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. याच महिलेचा शोध मागच्या अनेक दिवसांपासून एनआयए घेत होती. अखेर ती महिला समोर आली आहे. या महिलेचे शुक्रवारी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. तसेच या मिस्ट्री वूमन संदर्भात लवकरच खुलासा होणार असल्याचे कळते.
प्रकरणात आणखी एक नवी कार
वाझे प्रकरणात शुक्रवारी आणखी एका कारची भर पडली आहे. वाझे प्रकरणात आत्तापर्यंत 7 अलिशान गाड्या एनआयएने जप्त केल्या आहेत. त्यात शुक्रवारी आठव्या गाडीची भर पडली आहे. एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज गाडी शुक्रवारी एनआयएने ताब्यात घेतली आहे. ही गाडी वाझेच चालवत असल्याचा संशय आहे.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : आठवी गाडी 'एनआयए'च्या ताब्यात; जाणून घ्या आलिशान गाड्यांबद्दल