मुंबई - चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत आहेत. त्यामुळे सत्य परिस्थिती काय आहे? हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, की चीनने लडाखच्या भागात तीन ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या बातम्या येत असून ही चिंतेची बाब आहे. परंतु, सरकारने अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. चीनने सीमेवर आगळीक केली आहे की नाही? याची माहिती मोदी सरकारने जनतेला द्यावी, ही काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची मागणी योग्यच आहे. सरकारने वस्तुस्थिती सांगावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या विषयावर जाहीर वक्तव्य करतात. पण, आता अचानक शांत का आहेत? ही शांतता कानठळ्या बसवणारी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेरोशायरी केली पण राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले.
चीनने भारताच्या ६० किमी आत प्रवेश केल्याच्या बातम्या असून लडाखमधील पेंगांग लेक, गलवान रिव्हर व्हॅली व हॉट स्प्रिंग कोंका पास या भागात चीनी सैन्याने अतिक्रमण केल्याच्या बातम्या येत आहेत. ग्लोबल टाईम्स या चीनी माध्यमाने चीन यावेळी फार तयारीने आला आहे, असे व्हिडिओद्वारे जगाला सांगितले आहे. मोदीजींनी अनेकदा चीनवर लाल डोळे करुन कठोर कारवाई केली पाहिजे, असे म्हटले होते. परंतु, आता मात्र वेगवेगळ्या स्तरावर चीनशी चर्चा सुरू आहेत, असे दिसते.
चीनने भारताचा भूभाग बळकावला असेल, तर मोदी सरकारने चीनवर कठोर कारवाई केल्यास काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असेल. जग कोरोनाशी झुंजत असताना चीनची ही घुसखोरी कदापी सहन करता कामा नये, असे सावंत म्हणाले.