मुंबई - विनायक सावरकर यांच्याबद्दल भाजपला कसलेही प्रेम नाही. परंतू, राजकीय फायद्यासाठी भाजपचे लोक सावरकरांचा हवा तेवढा फायदा करुन घेत आहेत. फायदा झाल्यानंतर सावरकरांना मिठाच्या खड्याप्रमाणे बाजूला केले जाते असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून काढण्यात येत असलेल्या 'शिदोरी' या मुखपत्रात सावरकरांबद्दल आलेल्या लेखावर आक्षेप घेतला. याबद्दल काँग्रेसने माफी मागावी, तसेच हा अंक मागे घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर सावंत यांनी सावरकरांबद्दल भाजपला काही देणेघेणे नाही. परंतू, राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर केला जात असल्याची प्रतिक्रिया दिली. 'शिदोरी' मध्ये जो लेख देण्यात आला आहे. त्या लेखात सावरकरांची वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे. इतिहास हा इतिहासच असतो, त्यात बदल केला जात नाही. जी वस्तुस्थिती आहे ती या लेखात मांडली असल्याचे सचिन सांवत म्हणाले.
या लेखातून फडणवीस आणि भाजपवाल्यांचे चांगले प्रबोधन होऊ शकते. त्यामुळे भाजपवाल्यांनी हा लेख वाचावा, असे उपरोधीक आवाहन सावंत यांनी केले. राज्यात भाजपचे सरकार गेल्याने फडणवीस यांना त्रास होत आहे. परंतु, त्यांच्या हातून सत्ता गेली हे अजून सत्य ते स्वीकारत नाहीत. राज्यात महाविकास आघाडी जनतेचे काम करत असल्याने त्यांना सहन होत नाही. म्हणूनच सावरकर यांच्या संदर्भात 'शिदोरी' मध्ये जो लेख आला आहे, त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. आम्ही सावरकर यांचा द्वेष करत नाही, त्यांच्या विचारांचा आम्ही विरोध करत असल्याचे सांवत यांनी स्पष्ट केले.