मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका माथेफिरूने पुन्हा हल्ला केला. आतापर्यंत त्यांच्यावर 12 वेळा असे हल्ले झाले आहेत. कधी अंडे मारले. कधी मिरची पावडर, चपला, शाई फेकली. थपडाही लगावल्या. मात्र, दिल्लीत त्यांच्या ‘आप’ने भाजप तसेच काँग्रेसचा दारुण पराभव केला व सत्तेवर आल्यापासून ते केंद्र सरकार व प्रशासनाशी झगडत आहेत. त्यातून होणाऱ्या संघर्षातूनच केजरीवाल यांच्यावर हल्ला होत असल्याचे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना मधून व्यक्त केले आहे.
केजरीवाल यांना दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून त्यांना मुख्यमंत्री म्हणून अमर्याद अधिकार हवे आहेत. म्हणजे दिल्लीस स्वतःचे गृहमंत्रालय व पोलीस बळ हवे. ते शक्य नाही. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ते शहर कमालीचे संवेदनशील आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा वगैरे ठीक, पण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राकडे असणे गरजेचे आहे. केजरीवाल यांना ते मान्य नाही व सरकारशी रोज संघर्ष करून ‘थपडा’ खात असल्याचा उल्लेख त्यांनी सामनात केला आहे.
केजरीवाल सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत चांगले काम केले. त्यांनी सरकारी शाळांचा दर्जा सुधारला व मोहल्ला क्लिनिकने गरीबांची सोय केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण त्यांना मधल्या काळात पंतप्रधान पदाचीच स्वप्नं पडू लागली व त्याच भ्रमिष्ठ अवस्थेत केंद्र सरकारवर बेलगाम आरोप सुरू केले असल्याची टीकाही त्यांनी केली.
नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. आपतर्फे आतिशी मार्लेना या पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांचा राजकारण्यांवर राग वाढला आहे. लोक नेत्यांना अजून जाहीर थपडा का मारीत नाहीत? याचे आश्चर्य वाटते. केजरीवाल यांना थप्पड का पडली? याचे उत्तर त्यांच्याच नेत्यांनी दिले असल्याचे सांगत आप पक्षावर निशाणाही साधला. मात्र, केजरीवालांना झालेल्या मारहाणीशी सहमत नसल्याचेही ते म्हणाले.
मोदींनाही कोपरखळी
राजकारणात व एकंदरीत समाजातच असहिष्णुता वाढत आहे व लोक मुद्दय़ांवरून गुद्यांवर येत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पंतप्रधान मोदी यांनीही नेमके याच मुद्दय़ांवर बोट ठेवले. मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे असे मोदी म्हणाले. त्या आधी ते एकदा असेही म्हणाले होते की मला खतम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. पंतप्रधानांना असे वाटावे हे काही बरोबर नसल्याचे सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.