मुंबई - काळजीवाहू’ सरकार फक्त ‘वर्षा’वर आहे. बांधून ठेवलेल्या सामानावर बसून त्यांना उलटसुलट कारवाया करता येणार नाहीत, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामधून लगावला आहे. तसेच पाच वर्षे या भयंकर स्थितीतून महाराष्ट्र गेला आहे. मात्र आता जनतेच्या मनाप्रमाणेच घडावे. यासाठी विठ्ठलाने लोटांगण घालणाऱ्या चंद्रकांतदादांना तरी सुबुद्धी द्यावे असे देखील म्हटले आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सादर करून मंत्रिमंडळ बरखास्त केले. सत्तास्थापनेचा घोळ संपलेला नसून त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याचे खेळ सुरू आहेत. गेल्या सात वर्षांत अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या व त्या प्रत्येक वेळी भाजपने तत्काळ सत्तास्थापनेचा दावा केला. पण महराष्ट्रात त्यांना ते करता आले नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
नवी राज्यव्यवस्था होईपर्यंत मावळत्या मुख्यमंत्र्यांचे सामानसुमान ‘वर्षा’ बंगल्यावर राहू शकते. ते ‘काळजीवाहू’ या बिरुदावलीने तिथे थांबतील, पण किती दिवस याचा निर्णय राज्यपालांना घ्यावाच लागेल. कारण काळजीवाहू सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत, पोलिसांना आदेश देण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे काळजीवाहूंचे राजकीय कार्यकर्ते म्हणून बडय़ा पोलीस अधिकार्यांना काम करता येणार नाही. असे कोणी करत असतील तर त्यांनी भविष्याचे भान ठेवावे हे आम्ही आजच बजावत असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.
राज्याची स्थिती अस्थिर आहे, पण ही अस्थिरता लवकरच संपेल व शेतकरी, कष्टकर्यांच्या मनातील रयतेचे राज्य येईल. राष्ट्रपती राजवट म्हणजे काही संकट नाही. 9 तारखेनंतर सरकार स्थापनेची हालचाल राज्यपाल सुरू करतील. सर्वात मोठ्या पक्षाला ते सरकार स्थापनेसाठी बोलवू शकतात. भाजपने ही संधी दवडू नये, पण सर्वात मोठा पक्ष म्हणून ते पुढाकार घेत नसतील तर तो त्यांचा प्रश्न.
निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत जे सत्तास्थापनेचे ठरले होते त्यावर त्यांच्या मुखातून शब्द निघत नाही. पुन्हा ‘असं बोललोच नाही,’ ‘असा शब्द दिलाच नाही’ असे सांगतात. या शब्दांच्या फिरवाफिरवीचा या बनवाबनवीचा आम्हाला वीट आला आहे व जनतेलाही उबग आला आहे. शिवसेनेशिवाय सरकार बनणार नाही, पण शिवसेनेबरोबर जे ठरले होते त्यावर मागे हटायचे हे कसले राजकारण? असल्या भंपक राजकारणाचा चिखल आम्ही आमच्या अंगास लावून घेऊ इच्छित नाही. आम्हाला स्वच्छ, नितळ, शब्दाला जागणारे राजकारण करायचे असल्याचेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे.