मुंबई - सरकार कोणाच्याही पाठिंब्याने चालले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना आतून-बाहेरुन जशी आहे तशीच आहे. विचार आणि भूमिकेत कोणतेही बदल झाले नाहीत. अयोध्येचा राजा हा सगळ्यांचा आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि हिंदूत्व ही काही एका पक्षाची जाहागिरी नसल्याचे म्हणत शिवसेनेने मुखपत्र सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच हे सरकार १०० दिवस चालणार नाही, असे दावे ८० तासवाले करत होते. त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने १०० दिवसात बरेच काही करुन दाखवल्याचे सेनेने म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवार) अयोध्या दौऱ्यावर आहेत. हातात सत्ता नसतानाही ते रामचरणी गेले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही ते अयोध्येत जात आहेत. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला आबालवृद्ध सुखाने नांदावेत, राज्यात एकात्मता नांदावी अशी प्रार्थना मुख्यमंत्री रामचरणी करणार असल्याचे सेनेने म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा मतलबाशिवाय आहे.
हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते
हे सरकार छत्रपती शिवरायांच्या न्यायबुद्धीने, तितकेच श्रीरामाच्या सत्य मार्गाने चालेल. जनतेला दिलेल्या वचनांना जागणारे हे सरकार आहे. हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते, असे सेनेने म्हटले आहे. जनतेच्या मनात अविश्वासाची किरणे होती, त्याचे रुपांतर विश्वासाच्या किरणात करण्याची किमया ठाकरे सरकारने १०० दिवसात केल्याचे सेनेने म्हटले आहे.
काही सरकारे फक्त दिवस ढकलतात, भाजपला टोला
काही सरकारे फक्त दिवस ढकलतात. ते फक्त जाहीरात रुपाने उत्सव साजरा करतात. असा जाहीरातबाजी राजकारणी मुखवट्यांचे गेल्या १०० दिवसात महाराष्ट्रात फाटल्याचे म्हणत सेनेने भाजपला टोला लगावला. अशा मुखवटेबाजांची होळी करुन मुख्यमंत्री अयोध्येला निघाले आहेत. ते अयोध्येला जात असल्याने विरोधकांची पंचाईत झाली असल्याचे सेनेने म्हटले आहे.