मुंबई - कोरोनामुळे महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिल्या जात आहे. मात्र अशाच ऑनलाइन वर्गात चक्क अश्लील व्हिडिओ सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असतानाच काही अज्ञातांनी अश्लील व्हिडिओ अपलोड केले. याप्रकरणी जुहू पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
असा घडला प्रकार
प्राप्त माहितीनुसार आरोपींनी तांत्रिक माध्यमांचा वापर करत ऑनलाइन वर्गात प्रवेश केला. याच दरम्यान महाविद्यालयाचा ऑनलाइन वर्ग सुरू असताना काही अज्ञात सायबर हॅकरने सिस्टम हॅक करून अश्लील व्हिडिओ पोस्ट केले. मुंबईतील जुहू पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या प्रकरणात सायबर पोलिसांकडूनही अधिक तपास केल्या जात आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून काही लोक सायबर धमकी देऊन ऑनलाइन अश्लील कृत्य करताना दिसूत येत आहेत. यासह काही लोक ऑनलाइन अभ्यासादरम्यान सायबर धमकी देऊन आणि शिक्षकांना त्रास देऊन अश्लील संभाषणे देखील करत आहेत. तसेच हे प्रकार काही लोक स्वत:च्या आनंदासाठी करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईतील साकीनाका येथिल एका खासगी वर्गाच्या ऑनलाइन सत्रादरम्यान सायबर धमकी देऊन अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल राजस्थानमधील एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आले होते. दरम्यान देशात अशी प्रकरणे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज असल्याचे पुढे आले आहे. एकीकडे कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र ऑनलाइन क्लासेसमध्ये घडत असलेले अश्लील प्रकार चिंताजनक ठरत आहे. दरम्यान या प्रकरणात जुहू पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हे नोंदविले आहे.