मुंबई BMC Covid Scam : राज्यात मुंबईतील कोविड घोटाळ्यामुळं वातावरण तापलं आहे. ठाकरे सरकारनं तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यातच अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कोविड काळातील केलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. त्यावर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तीन पानांचा अहवाल गलगली यांना दिला आहे.
सर्वाधिक खर्च जम्बो कोविड सेंटरवर : याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना काळातील चार हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या खर्चाचा तपशीलवार मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे. माहिती अधिकारात आयुक्तांनी ही माहिती दिली. यातील सर्वाधिक खर्च हा जम्बो कोविड सेंटरवर करण्यात आल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. या जम्बो कोविड सुविधा केंद्रावर पालिकेनं तब्बल 1 हजार 466.13 कोटी रुपय खर्च केल्याची माहिती खुद्द पालिका आयुक्त चहल यांनीच आपल्या अहवालात दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आयुक्त चहल यांच्या कार्यालयात अर्ज करून कोरोना काळात केलेल्या खर्चाबाबत माहिती मागितली होती.
1 हजार 466.13 कोटी खर्च : मुंबईतील 13 जम्बो कोविड सुविधा केंद्रांवर 1 हजार 466.13 कोटी खर्च करण्यात आला आहेत. त्यानंतर मुंबईतील 24 वॉर्ड तसंच सेवेन हिल रुग्णालयासाठी 1 हजार 245.25 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयानं 233.10 कोटी खर्च केले आहेत. मुंबईतील पाच प्रमुख रुग्णालयांनी 187.7 कोटी, सहा विशेष रुग्णालयांनी 25.23 कोटी, 17 उपनगरीय रुग्णालयांनी 89.70 कोटी तसंच नायर रुग्णालयानं 1.48 कोटी रुपयाचा निधी खर्च केला आहे.
खर्चाची श्वेतपत्रिका काढा : पालिकेकडून देण्यात आलेली आकडेवारी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंतची असल्याचं गलगली यांनी म्हटलं आहे. माहितीच्या तपशीलात अन्नाची पाकिटं, अन्नधान्य यावर 123.88 कोटी, मध्यवर्ती खरेदी विभागानं 263.77 कोटी, वाहतूक विभागानं 120.63 कोटी, यांत्रिक तसंच विद्युत विभागानं 276.71 कोटी, घनकचरा विभागासाठी 6.85 कोटी खर्च करण्यात आले आहेत. कोरोना काळातील आरोग्य सुविधांवरील आकडेवारी जरी स्पष्ट असली तरी, कोविड काळातील सर्व प्रकारच्या खर्चावर श्वेतपत्रिका काढण्यात यावी, असं गलगली यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
हेही वाचा -