मुंबई: कुटूंबीयांसोबत भांडणे होणे, बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आदी कारणाने लहान मुले आपल्या घरातून पळून जातात. यामधील काही मुले मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये आलेली मुले घर आसरा नसल्याने प्लॅटफॉर्मवर राहतात. तर काही रेल्वेमधून फिरत असतात. अशा मुलांची आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पोलिसांकडून विचारपूस केली जाते. त्यांची माहिती मिळवली जाते. त्यांच्या कुटूंबीयांशी संपर्क साधून त्या मुलांना त्यांच्या ताब्यात दिले जाते. ज्या मुलांचे कुटुंबीय नसतात अशा मुलांना लहान मुलांसांठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन या एनजीओच्या ताब्यात दिले जाते. या मोहिमेला ऑपरेशन नन्हें फरिश्ते असे नाव देण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
९७५ मुलांना दिले ताब्यात: ऑपरेशन नन्हे फरिश्तेच्या माध्यमातून ग्लॅमर, चांगले राहणीमान, घरातील भांडणे यामुळे घरापासून दूर झालेली मुंबई रेल्वेच्या हद्दीत ६५० मुले आणि ३२५ मुली अशा एकूण ९७५ मुलांना घरच्यांच्या तसेच एनजीओच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही मुले प्लॅटफॉर्मवर मिळून आली आहेत. तसेच काही मुले रेल्वेच्या हद्दीत सीसीटीव्हीमध्ये दिसली आहेत. अशा मुलांची माहिती मिळवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना घरच्यांच्या तसेच एनजीओच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
१४३ स्थानकांवर चाईल्ड हेल्प डेस्क: रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर २०२१ मध्ये रेल्वेच्या संपर्कात आलेल्या तसेच अडचणीत असलेल्या मुलांची चांगली काळजी आणि संरक्षण करण्यासाठी एक सुधारित मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. जी २०२२ मध्ये कार्यान्वित झाली आहे. रेल्वेच्या १४३ स्थानकांवर चाईल्ड हेल्प डेस्क आहे. आरपीएफने २०२२ मध्ये रेल्वेच्या हद्दीत कुटुंबापासून दुरावलेल्या देशभरात १७ हजार ७५० मुलांना त्यांच्या कुटूंबीयांकडे तसेच एनजीओच्या ताब्यात दिले आहे.
रेल्वे संरक्षण दल : रेल्वे संरक्षण दलाची स्थापना RPF कायदा, १९५७ अंतर्गत भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि सुरक्षितता यासाठी करण्यात आला आहे. आरपीएफला रेल्वे मालमत्ता कायदा 1966 च्या तरतुदींनुसार रेल्वे मालमत्तेवरील गुन्ह्यांचे प्रकरण हाताळण्याचा अधिकार आहेत. 2004 पासून रेल्वे प्रवासी क्षेत्र आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. हे दल रेल्वे प्रवासी, प्रवासी क्षेत्र आणि रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास आणि सुरक्षितता सुलभ करण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध अविरत लढा देत आहे. या दलात ९ टक्के महिला जवानांचा समावेश आहे.