मुंबई : गोरेगावच्या एसआरएमध्ये खोली देण्याचे आमिष दाखवून तरुण आणि त्याच्या मित्राची फसवणूक करणाऱ्या दोघांना दिडोशी पोलिसांनी अटक केली आहे. नरेंद्र भरत सिंग, अलेक सूरज राय अशी या दोघांची नावे असून हे दोघेही फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यात त्यांचा तिसरा सहकारी कृष्णकांत सोनवडकर हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. २५ वर्षांचा तक्रारदार तरुण रोशन हेमंत न्याहारकर हा गोरेगाव परिसरात राहतो. त्याचा स्वत: चा व्यवसाय असून तो बोरिवली परिसरात साईट इंजिनिअर म्हणून कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्या कंपनीचे गोरेगाव येथील गोकुळधाम येथे काम सुरु होते. तिथेच काही कर्मचारी कामाला होते. कामादरम्यान त्याची राजेश यादवशी ओळख झाली होती. राजेशचा इमारत मटेरियलचा व्यवसाय असून तो इमारत, रस्त्याच्या कामासाठी आवश्यक सिमेंट, रेती, खडी पुरविण्याचे काम करीत होता. राजेशने त्याची ओळख नरेंद्र, आलोकशी करुन दिली होती. ते दोघेही एजंट असून ते त्यांना नवीन घर घेण्यासाठी मदत करतील असे सांगितले.
३२ लाख रुपयांमध्ये फ्लॅट : काही दिवसांनी ते दोघेही कृष्णकांतसोबत या दोघांना भेटण्यासाठी आले होते. कृष्णकांतने तो महानगरपालिकेत कामाला असल्याचे सांगून त्यांना नवीन रुम देण्याचे आश्वासन दिले होते. गोरेगाव येथील दिडोंशी विशेष न्यायालयाजवळील जनरल ए. के वैद्य मार्गावर एका एसआरए इमारतीचे काम सुरु असून या इमारतीमध्ये ३२ लाख रुपयांमध्ये फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. मात्र ही रक्कम जास्त असल्याने कृष्णकांतने त्यांना २८ लाखांना रुम देण्याचे सांगून तीन महिन्यांत रुमचा ताबा मिळेल असे सांगितले. त्यानंतर रोशनने कृष्णकांतसह इतर दोघांना रुमसाठी साडेचौदा लाख तर, राजेशने सहा रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांना रुम अलोट झाल्याचे कागदपत्रे देण्यात आले होते.
दिडोंशी पोलिसांत तक्रार : या कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी रोशन हा वांद्रे येथील एसआरए कार्यालयात गेला होता. यावेळी त्याला ते ऍलोटमेंट बोगस असल्याचे समजले. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे रुमसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, या तिघांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. या तिघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच रोशन न्याहारकरने दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती.
दोघांना सात महिन्यानंतर अटक : याप्रकरणी बोगस दस्तावेज देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पळून गेले होते. अखेर पळून गेलेल्या नरेंद्र सिंह, सुरज राय या दोघांना सात महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - Adani Ports: अदानींची मोठी खेळी.. आणखी एक बंदर घेतले ताब्यात, अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण