मुंबई- आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद, त्यानंतर रश्मी ठाकरे यांची 'सामना'च्या संपादक पदी नियुक्ती. यावरुन भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरुन भाजपवर पलटवार केला आहे. भाजपने एका मंत्री नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवले होते. म्हणजे भाजप जर कमी अनुभवाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करत असेल तर भाजपने एखाद्याच्या अनुभवाबद्दल बोलणं किती योग्य? असे पवार म्हणाले.
हेही वाचा- 'महासत्तेची स्वप्न बघण्याचा आपल्याला अधिकार आहे काय?'
मुळातच पूर्वीच्या काळात सामनाचे संपादकपद बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंकडे आणि आता त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला मिळाले आहे. यात आक्षेपाचे कारण काय? तो त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे.
भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले होते. त्यांच्याकडे अनुभव नव्हता. म्हणजे भाजप जर कमी अनुभवाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करत असेल तर भाजपने एखाद्याच्या अनुभवाबद्दल बोलणे किती योग्य आहे. आदित्य ठाकरे यांना चांगली संधी मिळाली आहे. ते चांगले काम करत आहेत.
शरद पवारांनी देशासंदर्भात किंवा राज्यातील एखाद्या चुकीच्या व्यवस्थे किंवा घटनेसंदर्भात वक्तव्य केले तर गैर काय? सुब्रमण्यम स्वामींनीसुद्धा यापूर्वी स्वतःच्याच सरकारविरोधात वक्तव्ये केली आहेत, असे रोहित पवार म्हणाले.