मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची आज मुंबईत खासगीरित्या भेट घेतली. पवार आणि ठाकरे घराण्यांच्या वारसदारांनी एकमेकांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
मुंबईच्या लोअरपरेल येथील फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये आज दोघांनी दुपारी दीडच्या सुमारास भेट घेतली. जवळपास दीड तास चर्चा चालली. रोहित आणि अमितने सोबत जेवणही केले. याआधी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून राज यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जवळीक झाली असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत केल्याच्या चर्चा रंगत होत्या.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची दिवसेंदिवस क्रेझ वाढत आहे. त्यामुळे अमित ठाकरेंना राजकारणात सक्रिय करण्याची कुजबुज सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेने विरोधी तोफ डाखली तरी लोकसभा निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी ठाकरे वॉर पुन्हा सक्रिय करण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची चर्चा आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घ्यावे असा सूर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अमित ठाकरे यांचा फुटबॅाल हा आवडता खेळ आहे. सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे त्यांनी निमंत्रण दिले असल्याचे रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरील पेजवर स्पष्ट केले.
अमित ठाकरे यांनी यावेळी फुटबॉल सोबतच अनेक मुद्द्यांवर तरुणांशी चर्चा केली. तसेच पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीच्या उपायांवर चर्चा यावेळी झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या, या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.