मुंबई - सार्वजनिक ठिकाणी काम आणि स्वागत करणारा रोबोट पहिला असेल. मात्र, आता भारतात चक्क अभिनय करणारा रोबोट येणार आहे. आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या टेकफेस्टमध्ये रोबोट पाहता येणार आहे. देशात येणारा हा पहिलाच कलाकार रोबो असणार आहे.
आयआयटी मुंबईमध्ये येत्या ३ ते ५ जानेवारी दरम्यान टेकफेस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जगभरातील वैज्ञानिक आपले संशोधन सादर करणार आहे. त्यामुळे कोणता देश आपले जीवनमान सुधारण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतो? हे यावेळी विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे. या महोत्सवात सादर करण्यात येणारा रोबो हा जगातील पहिला नृत्य सादर करणारा कलाकार रोबोट आहे. तो प्रत्येक ठिकाणी कला सादर करत असतो. त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर तो यंदाची थीम 'डेव्हिसियन स्पेक्टॅकः ए आर्ट ऑफ सायन्स अॅण्ड सायन्स' साकारणार आहे. देशभरातील तंत्रज्ञानाचे जाणकार विद्यार्थ्यांची आणि इच्छुक कलाकारांची कल्पना नक्कीच त्याला पटेल.
रोबोथेस्पीअन हा एक सार्वजनिक अभिनय क्षेत्रात मानवी संपर्कासाठी डिझाइन केलेला अभिनय ह्युमनॉइड आहे. त्याच्या मोहक हालचाली, विलक्षण देहबोली आणि भावना व्यक्त करणारी कौशल्ये पाहण्यासारख्या आहेत.
त्याच्या एलसीडी डोळ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. तसेच त्याच्या शरीरातील सेलमध्ये भावनात्मक एलईडी लाईटिंग आहे. त्यामुळे त्याच्या भावनांशी जुळण्यासाठी प्रेक्षकांना मदत होते. तो कोणत्याही कला सादर करू शकतो. गाणे, नृत्याबरोबर तो प्रेक्षकांमधील एखाद्याच्या हालचालींची नक्कल करत गर्दीतील चेहरेही ओळखू शकतो.
असा आहे रोबो -
रोबोची उंची 175 सेमी असून त्याचे वजन 33 किलोग्राम आहे. त्याची बॉडी अॅल्युमिनियमची असून तो माणसासारख्या सर्व हालचाली करतो. तसेच समोरची व्यक्ती पुरुष आहे, की स्त्री हे देखील तो ओळखतो. इतकेच नाहीतर त्याचे वय देखील तो सांगू शकतो. त्याच्याकडे 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये बोलण्याची कला असून 70 पेक्षा जास्त आवाजांमध्ये तो बोलू शकतो.