मुंबई - कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई महापालिकेने रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यांच्या खाली असलेल्या कल्व्हर्टच्या (नाले) सफाईसाठी २ अमेरिकन रोबो आणले आहेत. मात्र, आता तांत्रिक अडचणींमुळे या रोबोच्या कामाचा वेग मंदावला आहे.
क्लीनिंगसाठी आणण्यात आलेले हे रोबो अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनिया येथून आयात करण्यात आले आहेत. प्रत्येकी 6 कोटी रुपये एका रोबोसाठी पालिकेने खर्च केले आहे. एकावेळी जास्तीतजास्त ७०० किलो वजनाचा गाळ काढण्याची क्षमता या रोबोची असल्याचा दावा पालिकेच्या पर्जन्य विभागाने केला होता.
महापालिकेच्या क्षेत्रातील ब्रिटिशकालीन भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई एप्रिलपासून रोबोद्वारे सुरू करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणी भेडसावत असल्यामुळे रोबोकडून हवे तितके काम करून घेता येत नसल्याचे पालिकेच्या पर्जन्य जल खात्याकडूनच सांगण्यात आले. रोबोकडून साफसफाई करण्याचे काम दक्षिण मुंबईत टाऊन हॉल व ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ सुरू आहे.
रोबोचे काम प्रगती पथावर आहे. मात्र, हवे तसे काम त्यांच्याकडून करून घेता येत नाही. मुंबईत भूमिगत नाल्यांमध्ये माती खूप आहे. मुंबई शहरात रोबोकडून रात्रीच्या वेळीच काम करून घेता येते. या कामासाठी रात्री फक्त ३ ते ४ तास मिळतात. तर दिवसा वाहतुकीमुळे काम करता येत नाही. सध्या या समस्यांमुळे रोबोचे काम करण्याचे स्पीड कमी आहे. ते वाढवण्यासाठी व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पालिकेच्या पर्जन्य जल विभागाचे प्रमुख जल अभियंता श्रीकांत कवाले यांनी सांगितले.