मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून तपास केला जात असून या तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. शुक्रवारपासून सीबीआयच्या पथकाने तपास सुरू केला असून वांद्रे पोलिसांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे व सुशांतसिंहने ज्या वेळेस आत्महत्या केली होती, त्यावेळच्या त्याच्या घरातील काही वस्तू सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. सुशांतचे तीन मोबाईल, लॅपटॉप, डायरी त्याचप्रमाणे त्याच्या अंगावरील कपडे, पोस्टमार्टम रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट या सर्व गोष्टी सीबीआयला मिळाल्या आहेत.
सुशांतसिंह ऑपटेप्सी रिपोर्टच्या संदर्भात सीबीआयचे पथक हे आणखी खोलात जाऊन तपास करणार आहे. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रिणी रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयात गेली असल्याचीही माहिती समोर आली आहे. कूपर रुग्णालयाच्या शवागरात रिया चक्रवर्तीने तब्बल 45 मिनिटे घालवली असून यादरम्यान तिने सुशांतचा मृतदेह पाहिला असल्याचे तपासात समोर आले आहे.