मुंबई - अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहे. यामुळे रियाला उद्या (रविवारी) 6 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला शुक्रवारी अटक केली होती. यामुळे चौकशीनंतर रियाला अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात शनिवारी न्यायालयाने शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) कोठडीत 9 सप्टेंबरपर्यंत पाठवले आहे.
शोविक आणि मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत नार्कोटिक्स कस्टडी -
एनसीबीने शौविक आणि मिरांडाचा सात दिवसांचा रिमांड मागितला होता. न्यायालयाने त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत नार्कोटिक्स कस्टडी दिली आहे. त्याचबरोबर शौविक चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी रिमांडला विरोध केला आहे. आपल्या 50 मिनिटांच्या युक्तिवादात अॅडव्होकेट मानेशिंदे यांनी शोविक चक्रवर्तीची बाजू मांडली. याशिवाय मुंबईतील कोर्टाने कैझान इब्राहिमला 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.
एनसीबीने माध्यमांशी साधला संवाद -
एनसीबीचे उपमहासंचालक जैन यांनी माध्यमांना सांगितले, या प्रकरणात दोन आरोपींचा रिमांड नुकताच प्राप्त झाला आहे. तपासात आणखी खुलासे होतील. रियालाही लवकरच योग्य वेळी चौकशीसाठी बोलवले जाईल. आरोपींना समोरासमोर बसवून तपासणी केली जाईल. या प्रकरणात बरीच माहिती समोर येणे बाकी आहे. रियाला अंमली पदार्थांच्या संदर्भातही विचारले जाईल, असे जैन म्हणाले.