मुंबई : इंडियन आयडॉल हा अनेक वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यातून गायक गायिकांचा शोध घेणारा सांगीतिक रियालिटी शो आहे. यावेळेस त्याचा १३वा सिझन सुरु होता. नेहमीप्रमाणे यातून उत्तमोत्तम गायकी अनुभवायला मिळाली. संगीतक्षेत्रातील अनेक आघाडीचे कलाकार, संगीतकार हा शो इमानेइतबारे फॉलो करीत असतात. त्यातील उत्तम गायकांना पार्श्वगायनाची संधी देत असतात. गेले ८-९ महिने सुरु असलेला इंडियन आयडॉल सिझन १३ चा फिनाले नुकताच पार पडला. ऋषी सिंह यावेळी इंडियन आयडॉल १३ च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला. त्याला झगमगती ट्रॉफी, रोख २५ लाख रुपये मिळाले. मारुतीतर्फे एक नवीकोरी ब्रीझा कार भेट देण्यात आली.
अटीतटीची स्पर्धा : इंडियन आयडॉल सिझन १३ मधील ६ स्पर्धकांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. कारण सर्वच स्पर्धक उत्तम गाणारे होते. कोलकाता येथील बिदिप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कर आणि देबोस्मिता रॉय या मुली तर जम्मू काश्मीरचा चिराग कोतवाल, वडोदरा येथील शिवम सिंह आणि अयोध्या येथील ऋषी सिंह ही मुले फिनालेचा भाग होते. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत कार्यक्रम सादर करण्यात आले. पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या इंडियाज बेस्ट डान्सरचे जज गीता कपूर, टेरेन्स लुईस आणि सोनाली बेर्डे येथे हजेरी लावून होते. इंडियन आयडॉल १३ चे जज विशाल ददलानी, हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कर स्पर्धकांचे मनोबल उंचावताना दिसत होते.
ट्रॉफीवर विजय : इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकणे हे प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न असते. यावेळी ऋषी सिंहचे स्वप्न पूर्ण झाले. देबोस्मिता रॉय दुसऱ्या क्रमांकावर होती, तर तिसऱ्या स्थानावर चिराग कोतवाल आला. चवथ्या नंबरवर बिदिप्ता चक्रवर्ती तर पाचव्या आणि सहाव्या नंबरवर आले शिवम सिंह आणि सोनाक्षी कर हे आहेत. इंडियन आयडॉल १३ च्या ट्रॉफीवर विजय मिळाल्यावर ऋषी सिंहच्या आनंदाला पारावर उरला नाही.
संपूर्ण टीमचा आभारी : त्याने सांगितले की, या सीझनचा विजेता होणे हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. एवढ्या लोकप्रिय आणि प्रतिष्ठित शोचा वारसा पुढे नेणे, हा खूप मोठा सन्मान आहे. आमची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल मी सोनी चॅनेलचा ऋणी आहे. मी चॅनल, जजेज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. हा संगीतमय प्रवास रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. हे प्रतिष्ठित विजेतेपद जिंकण्यासाठी मला मत दिले. माझे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल शतशः धन्यवाद, असे तो म्हणाला.
पवनदीप राजन विजयी : इंडियन आयडॉल सिझन 12 मध्ये पवनदीप राजन हा विजयी झाला होता. अरूणिता कांजीलाल ही फर्स्ट रनर अप ठरली होती. मागील सिझन देखील रोमांचक ठरला होता. सायली कांबळेने इंडियन आयडॉल 12 मध्ये तिसरे स्थान पटकावले होते. अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, पवनदीप राजन, निहाल तारो, मोहम्मद दानिश आणि षण्मुखप्रिया हे 12 व्या सिझनमधील अंतिम फेरीतील 6 स्पर्धक होते.