मुंबई - कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयके मंजूर करून घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत, यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. काँग्रेस पक्ष या शेतक-यांसोबत असून कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. तसेच राऊत, फडणवीसांच्या भेटीसंदर्भात बोलताना शिवसेना आमच्या सोबत असल्याचे थोरात म्हणाले.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. आज राज्यभरात #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतक-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनतेने भाजप सरकार व त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करून शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्याची मागणी समाजमाध्यमांवर व्हिडीओ अपलोड करून केली.
हेही वाचा - लज्जास्पद.. पुण्यातील कोरोना केंद्रात महिला डॉक्टरचा विनयभंग; सहकारी डॉक्टरांविरोधात गुन्हा
कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांना मोठा आधार आहेत. हा आधारच मोडीत काढण्याचे काम या नव्या कायद्यामुळे होणार आहे. एमएसपीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत होता. तोही या नव्या कायद्यामुळे संपुष्टात येणार असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अजून बळकट केले पाहिजे, किमान आधारभूत किंमतीची तरतूद नव्या कायद्यात असली पाहिजे, या मागण्यांसह काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर आंदोलनात उतरला आहे. हे काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन, मोर्चे काढणार आहे. सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. तसेच एक कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहे. अन्नदात्याला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शिवसेना आमच्या सोबत -
केंद्र सरकारने कृषी विषयक कायदे केले आहेत ते शेतकरी विरोधी आहेत. त्याचा काँग्रेसने विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा विरोध आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संजय राऊत हे एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. ते कोणालाही भेटू शकतात. या भेटीला जास्त महत्व देण्याची गरज नाही. आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष सोबत आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे.