मुंबई : मुलुंड येथील म्हाडा कॉलनीतील सह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या छाया यादव यांची ती पेन्शन अखेरची पेन्शन ठरली आहे. छाया यादव या निवृत्त नर्स असून त्या पेन्शनचे पैसे काढून भाजी खरेदी करून घरी परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. ७२ वर्षीय छाया यांचा भरधाव क्लीनअप खाली येऊन मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. यापाराकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून चालक प्रेमचंद प्रजापती याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
महिलेवर काळाच घाला : छाया यादव या निवृत्त नर्स पेन्शनचे पैसे काढून घरी परतत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील निवृत्त ७२ वर्षीय निवृत्त परिचारिकेचा भरधाव क्लीनअप खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना मुलुंडमध्ये घडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी क्लीनअप चालक प्रेमचंद प्रजापती याला अटक केली आहे.
अशी पटली ओळख : म्हाडा कॉलनीतील सह्याद्री सोसायटीत छाया रामकृष्ण यादव या नातीसोबत राहण्यास होत्या. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळच्या बँकेतून पेन्शनचे पैसे काढून भाजी खरेदी केली. तेथून घरी परतत असताना आर. आर एज्युकेशन रोड येथे रस्त्यात चालताना पालिकेच्या भरधाव क्लीनअप खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडील बँकेच्या पासबुकवरून त्यांची ओळख पटली.
चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात : कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळावरून चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीला अटक केली असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी दिली आहे.
घटनास्थळी अपघात होण्याची शक्यता : नवघर रोड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पार्किंग असते. याबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली आहे. तसेच, त्यात रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या कामांमुळे वाहनांना जाण्याची वाट अरुंद होत आहे. याचा फटका पादचाऱ्यांना बसत आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेतही रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग होती. अशात, मोठ्या क्लीनअप गाडीला जाण्यास मार्ग छोटा झाला आणि त्यातून आणखीन अपघात घडू शकतात, अशी शक्यता तेथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या रस्त्यावर असलेली दुतर्फा पार्किंगवर कारवाई करून स्थानिकांना मोकळा रस्ता करून दिला तर असे अपघात टळतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Student Suicide In Latur : वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या