मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वीचा ऑनलाईन निकाल आज (शुक्रवारी) 16 जुलैला दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदाची दहावीची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे याचा निकाल मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात येणार आहे, असे राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते.
१६ लाख ५८ हजार विद्यार्थीचे भविष्य ठरणार -
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६ लाख ५८ हजार ६२४ इतकी आहे. ज्यामध्ये ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी आणि ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थ्यांनी समावेश आहे. या १६ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना निकाल समाधानकारक वाटत नसेल, त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार परीक्षेची संधी उपलब्ध करू देण्यात येणार आहे.
अशी आहे निकालाची प्रक्रिया पूर्ण -
कोरोनाची गंभीर परिस्थिती, मुलांमधील संभाव्य वाढत्या प्रादुर्भावाची भीती, तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादीबाबी विचारात घेऊन यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची घोषणा सरकरातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने २१ मे २०२१ रोजी इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाची कार्यपध्दती जाहीर केली होती. यामध्ये नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यातील शिक्षकांना १० जून २०२१ रोजी शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते. त्यानुसार, २३ जून, २०२१ ते ०२ जुलै, २०२१ या कालावधीत माध्यमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दहावीचा निकाल कुठे पाहता येईल? -
आज दुपारी १ वाजता दहावीच्या निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल www.mahresult.nic.in, maharashtraeducation.com या संकेस्थळावर पाहता येणार आहे.