मुंबई - देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 21 रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. हे नवे निर्बंध सोमवारपासून (दि. 28 जून) लागू होणार आहेत. जाणून घ्या उद्यापासून राज्यात कुठे काय राहणार सुरू....
कसे असतील नवीन निर्बंध ?
राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती यानुसार जिल्ह्यांचे पाच स्तर करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला त्याबाबत निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काय सुरू काय बंद ?
नव्या नियमावलीनुसार राज्यात जमावबंदी लागू असेल. तसेच मॉल व सिनेमागृहे बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला दुपारी 4 वाजेपर्यंतच 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून शनिवार-रविवारी दोन दिवस रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद राहतील. सार्वजनिक स्थळे सकाळी 5 ते 9 पर्यंतच सुरू राहणार आहेत. यादरम्यान शासकीय कार्यालयातील उपस्थिती 50 टक्के असेल. तर खासगी कार्यालयांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यास ते 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येणार आहेत. चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभाला 100 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. तर लग्न कार्यासाठी 3 तासांचा वेळ देण्यात आला आहे. जर एकाच ठिकाणी दोन कार्यक्रम असेल तर दोन्ही कार्यक्रमांमध्ये पुरेसा कालावधी असणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. अंत्यविधीला केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाचे म्हणजे लोकल सेवेबद्दल अद्यापही कोणताही निर्णय झाला नसून केवळ अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लोकलमध्ये प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा - मालवाहतूक वाहनांवरील रिफ्लेक्टरच्या किंमतीवर निर्बंध