मुंबई - केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला राज्यातील चंद्रपूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, परभणी, बुलडाणा, पालघरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर कोल्हापूर मध्ये बंदला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अकोला आणि सोलापुरातील सांगोल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, तर ठाण्यामध्ये पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. नांदेडमध्ये या बंदचा शाळांवर परिणाम झालेला पाहायला मिळाला.
राज्यभरातील वंचित बहुजन आघाडीच्या बंदचा आढावा -
चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमुर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून शहरातून पदयात्रा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर येऊन उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ यांना निवेदन देण्यात आले. तसेच पदयात्रेच्या माध्यमातून बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
पुणे - वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद ला पिंपरी-चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सांगवी, पिंपळे गुरव, देहूरोड आणि पिंपरी बाजारपेठ येथे काही प्रमाणात दुकाने बंद होती, तर काही दुकाने सुरू होती. अनेक कार्यकर्त्यांनी एक दिवसापूर्वी आज दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, पिंपरी बाजारपेठेत कार्यकर्त्यांनी जावून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळी उघडलेली दुकाने दुपारपर्यंत पुन्हा बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
उस्मानाबाद - वंचित बहुजन आघाडी ने एन. आर. सी व सीएए च्या विरोधात महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर उस्मानाबादमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. साधारण 12 ते 1 च्या दरम्यान शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी काही काळ हे दुकाने बंद ठेवली. मात्र, दुपारच्यानंतर पुन्हा बहुतांश दुकाने खुली झाली होती. त्यामुळे उस्मानाबाद मध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदसाठी उस्मानाबाद शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात किंवा जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
लातूर - शहरात बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद असल्याचे पाहवयास मिळाले. भाजी मार्केटमध्ये कडकडीत बंद होता, तर औसा येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढून कडकडीत बंद पळाला. किल्ला मैदान-औसा मोड ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. जमाते-ए-उलेमा या संघटनेच्यावतीने तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले, तर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, उदगीर या ठिकाणीही बंद पाळण्यात आला होता. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली, तर निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही देण्यात आला. दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला होता. दुपारनंतर मात्र बाजारपेठ सुरळीत सुरू होत्या. जिल्ह्यात कुठेही या बंदला हिंसक वळण लागेलेले नव्हते. शहरासह जिल्हाभर पोलीस बंदोबस्त तैनात काण्यात आला होता.
परभणी - परभणी शहर तसेच संपूर्ण जिल्हाभरातील विविध बाजारपेठांमध्ये आज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. परभणी शहरातील प्रमुख भागातील बाजारपेठ सकाळी पूर्णतः बंद होती. मात्र, दुपारनंतर सर्वत्र दुकाने उघडल्याने बाजार सुरळीत चालू झाला. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये हीच परिस्थिती असली, तरी पाथरीमध्ये मात्र वंचित, माकप आणि इतर परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने जोरदार रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर मात्र तुरळक वाहतूक दिसत होती.
बुलडाणा - जिल्ह्यात बहुजन वंचित आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यात मलकापूर शहरात वंचित आघाडीसह बंदमध्ये सहभागी असलेले राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या माध्यमाने शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात दोन हजाराच्यावर नागरिक सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा आठवडी बाजार व इतर भागातून काढण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जालना - कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करण्यासाठी वेळेवर पोलिसांना परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारत नियोजित कार्यक्रमानुसार मोर्चा काढावा आणि आंदोलन करावे, असे सूचित केले. मात्र, काही कार्यकर्त्यांचे यावर समाधान न झाल्याने त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. काही क्षणातच पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला. त्यानंतर समन्वयाची भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मामा चौकातून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हा मोर्चा मस्तगड गांधीचमन शनिमंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असल्यामुळे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सोलापूर - जिल्ह्यातील सांगोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सांगोल्यातील महात्मा फुले चौकातून बंदच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्टेशन रोड ते तहसिल कचेरीपर्यंत रॅली काढण्यात आली होती. तहसील कचेरीसमोर त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले. यासंबंधीचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
पालघर - वंचित बहुजन आघाडीच्या बंदला पालघरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही काळ बंद होती. तसेच शाळा, महाविद्यालये सुरळीत सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त पाळण्यात आला होता.
ठाणे - वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्शवभूमीवर भिवंडीतील वंचितच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी धामणकर नाका येथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले. या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिवंडी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
नांदेड - जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, देगलूर, मुखेड, धर्माबादसह इतर तालुक्यात व्यापारी संकुल व शैक्षणिक संस्था बंद ठेवून केला निषेध केला. स्थानिक वंचित आघाडीच्या नेत्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत बंदचे आवाहन करत दुकाने बंद ठेवली. या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, बंदच्या काळात अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा सुरू होती. कार्यकर्त्यांनी आंनद नगर येथे स्कूलबसेस थांबवत त्यांना शाळेच्या दिशेने जाऊ न देता परत पाठवल्या. अनेक शाळांमध्ये परिक्षा सुरू आहेत. यामुळे बंदमधून शाळांना वगळले पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. दरम्यान आनंद नगर भागात सकाळी स्कूल बसेसची मोठी रांग लागली होती. बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अकोला - महाराष्ट्र बंदची हाक घेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी आले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले आमदार रणधीर सावरकर आणि वंचीतच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यावेळी उपस्थित पोलीस आणि वंचीतच्या पदाधिकाऱ्यांनी समोपचाराची भूमिका घेतल्याने वाद संपला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी एमआयडीसी ही बंद केली. अकोल्यामध्ये वंचितचे वर्चस्व असल्याने जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
कोल्हापूर - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहरातील बिंदू चौकात आज निदर्शने करण्यात आली. यावेळी एनआरसी आणि सीएए हे दोन्ही कायदे रद्द झालेच पाहिजेत अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. निदर्शने झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. यावेळी आंदोलनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या बंदचा कोल्हापुरात काहीही परिणाम जाणवला नाही. सकाळपासूनच कोल्हापुरातील जनजीवन सुरळीत सुरू होते.