नवी मुंबई - महिलांना जाळण्याच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यामध्ये पनवेल परिसरातील एका घटनेची भर पडली आहे. एका मध्यमवयीन महिलेला अगोदर जाळण्याचा प्रयत्न करून नंतर फासावर लटकवून मारल्याची घटना घडली. पनवेल तालुक्यातील दुंदरे येथील हा प्रकार समोर आला आहे. महिलेचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला, असे असतानाही महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत.
शारदा गोविंद माळी (वय 55) असे या मृत महिलेचे नाव आहे. शारदा माळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका गोपाळ पाटील (45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विट्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
दुंदरे येथील विश्वास गोविंद माळी यांच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र अल्पवयीन मुलगी न विचारता घेऊन गेली. याबाबत तीला विचारणा केली असता अलका पाटील आणि वनाबाई यांनी त्यांना शिविगाळ करुन मारण्याची धमकी दिली. गोपाळ पाटील आणि हनुमान पाटील यांनी विश्वास माळी व त्यांच्या आईला शिविगाळ केली. त्यानंतर विश्वास यांच्या आईला (शारदा माळी) आणि वडिलांना गावदेवी मंदिरात नेऊन शपथ घेण्यास लावले. या प्रकारामुळे शारदा यांनी आत्महत्या केली. शारदा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, शारदा यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करून नंतर फासावर लटकावून मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा न नोंदवता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.