मुंबई Ashish Shelar on Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला अयोध्येत होणारा प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह सर्व देशभर साजर केला जात आहे. आज मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क येथे भाजपाकडून प्रभु श्रीराम आणि मंदिराची विद्युत रोषणाईमध्ये प्रतिकृती साकारण्यात आलीय. हैदराबाद येथील कलाकारांनी हे विद्युत रोषणाईचं चित्र साकारलं आहे. याची उंची जवळपास ४५ फूट आहे. भव्य-दिव्य स्वरूपात असलेली प्रभू रामाची प्रतिकृती मुंबईकरांसाठी लक्षवेधी ठरली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही रोषणाई सुरू करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे त्याचबरोबर काँग्रेसवरही टीका केली आहे.
परिसर पूर्ण देशाचं केंद्र : याप्रसंगी बोलताना आशीष शेलार म्हणाले की, छत्रपती शिवाजी पार्कचा हा परिसर पूर्ण देशाचं केंद्र आहे. येथील गणेश मंदिर हे आपलं श्रद्धास्थान आहे. जे पावन आहेच ते आज उजळून निघाले आहे. रस्ता ओलांडला की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपलं प्रेरणास्थान आहे. जवळच बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे. तसंच आपली पिढी ही सौभाग्यशाली पिढी आहे. आपल्याला साक्षीदार म्हणून जे पाहायला मिळालं ते पुन्हा कोणाला बघायला मिळेल की नाही? याचं उत्तर शक्यतो नाहीच येईल. लतादीदी, सचिन तेंडुलकर, गावसकर, चंद्रावर आपल्या शास्त्रज्ञांनी केलेली यशस्वी चाल आपण पहिली आहे. बाबरी ढाचा खाली पडताना आपण पहिला. आता रामचंद्र मंदिर आपण पाहणार आहोत. साधू संत, महंत, विश्व हिंदू परिषद यांच्या प्रयत्नांनी निघालेत हिंदुत्वाचं जाज्वल्य म्हणून हा क्षण आपण अनुभवणार आहोत.
काँग्रेसने अयोध्येचं आमंत्रण का झिडकारलं : आशिष शेलार यांनी या प्रसंगी काँग्रेसवरही जहरी टीका केली. अयोध्येतील सोहळा कोणत्या एका पक्षाचा नाही. हा सोहळा समस्त राम भक्तांचा आहे. काही रावण भक्त सुद्धा आहेत. काँग्रेसने निमंत्रण स्वीकारलं नाही. त्याला समर्थन देण्याचं काम दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी केलं आहे. काळारामच्या मंदिरात तुम्ही राष्ट्रपतींना बोलवत आहात. पण, तुम्ही काँग्रेसने अयोध्येचं आमंत्रण का झिडकारलं? हे विचाराल असं आम्हाला वाटलं होतं. रामभक्त कोठारी यांच्या खुनाचं रक्त ज्या मुलायम सिंगच्या पक्षाला लागलं त्यांच्याशी तुम्ही हातमिळवणी केली. मला राजकारणावर बोलायचं नाही. पत्रकार पोपटलाल रोज सकाळी बोलतो म्हणून मी बोललो. कारण मी सुद्धा कारसेवेला गेलो होतो.
आंबेडकरांनी त्यांची भूमिका मांडली : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राम मंदिर आयोजकांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी राम भक्तांचा सोहळा आहे असं म्हटलं आहे. आंबेडकर यांनी त्यांची भूमिका मांडली. शरद पवार यांनीही त्यांची भूमिका मांडली आहे. पण ते जेव्हा मंदिरात येतील तेव्हा त्यांचं स्वागत असेल, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
हेही वाचा -